Headlines

सुमारे 150 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे दिली:वेदद्रीष्टी फाऊंडेशन आणि ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्राचा सहावा पदवीप्रदान सोहळा




पुण्यात वेदद्रीष्टी फाऊंडेशन आणि ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्राच्या सहाव्या पदवीप्रदान व पुरस्कार वितरण सोहळ्यात सुमारे १५० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि पारितोषिके देण्यात आली. विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या मान्यवरांनाही पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पद्मावती येथील विणकर सभागृहात हा कार्यक्रम झाला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी, स्वागताध्यक्ष मनोज राठी, संपर्कप्रमुख अॅड. श्रुती पिसे, पुरस्कारप्राप्त मान्यवर, विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. महाराष्ट्रासह देश-विदेशातील विद्यार्थ्यांनी संस्थेचे विविध अभ्यासक्रम पूर्ण केले होते. रत्नमाला कुलकर्णी यांच्या हस्ते वेदमूर्ती पं. मंदार जोशी यांना ‘रत्नमाला पुरस्कार’, ९० वर्षांच्या प्रतिभा भालेराव यांना ‘शारदा पुरस्कार’ आणि वंदना धर्माधिकारी यांना ‘अक्षरलक्ष्मी पुरस्कार २०२६’ देण्यात आला. वेदमूर्ती सुदर्शन कुलकर्णी आणि वेदमूर्ती अक्षय जोशी यांना ‘वेदविद्या भूषण पुरस्कार’, प्रा. श्रुती देवळे यांना ‘संस्कृत भारती पुरस्कार’, तर मालती मसलेकर, रविंद्र कुलकर्णी आणि रोहित तुळसे यांना ‘सहृदय पुरस्कार’ देण्यात आला. पुरस्कारार्थींना सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, पारंपरिक पगडी, श्रीफळ, सन्मानमाला आणि पुष्पगुच्छ देण्यात आले. वैदिक वाङ्मयाचा अभ्यास, संशोधन, अध्यापन, साहित्यनिर्मिती आणि भारतीय संस्कृतीच्या संवर्धनातील योगदानासाठी त्यांचा सन्मान करण्यात आला. पुरस्काराला उत्तर देताना वेदमूर्ती मंदार जोशी म्हणाले की, भारतीय विज्ञान आणि ज्ञानपरंपरा समृद्ध आहे. तिचे जतन करणे आणि अभ्यास व संशोधनातून त्यात भर घालणे ही आपली जबाबदारी आहे. वेद, पंचांग आणि प्राचीन ग्रंथांच्या अभ्यासातून समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असेही ते म्हणाले. वेदमूर्ती उमेश कुलकर्णी गुरुजी यांनी सामाजिक बांधिलकी, परोपकार, जलसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व सांगितले. समाजाकडून मिळालेल्या गोष्टींची परतफेड समाजसेवेतून करावी आणि ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करावा, असे त्यांनी सांगितले. पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन करत त्यांनी ‘पाणी जपा, पाणी वाढवा’ आणि ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश दिला. जलसंधारण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय योगदान देण्याचेही त्यांनी आवाहन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *