![]()
अमरावती येथील विभागीय क्रीडा संकुलातील मार्केटमधील स्क्वेअर कॅफेवर भरोसा सेल आणि दामिनी पथकाने धाड टाकली. या कारवाईत तीन प्रेमीयुगुलांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई आज, बुधवार, २४ जून रोजी दुपारी २ वाजता करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कॅफेमध्ये प्रेमीयुगुलांना तासाप्रमाणे पैसे आकारून अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत होती. दरम्यान गस्तीवर असलेल्या भरोसा सेल व दामिनी पथकाला आज दुपारी ही गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक ज्योती विल्लेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघाली गावंडे यांच्या नेतृत्वातील राजेश यादव, गजानन सातंगे व इतर सहकाऱ्यांनी स्क्वेअर कॅफेवर धाड टाकली. कॅफेची पाहणी केल्यावर तेथे वेगवेगळ्या केबिनमध्ये तीन प्रेमीयुगुल अश्लील चाळे करताना आढळून आले. पथकाने त्यांना ताब्यात घेतले. सदर कॅफेत केबिनमध्ये अंधार करून प्रेमीयुगुलांना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे कारवाई दरम्यान निदर्शनास आले. त्यानंतर सदर कॅफेचा व्यवस्थापक व प्रेमीयुगुलांना पुढील कारवाईसाठी गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
Source link
'स्क्वेअर कॅफे'वर पोलिसांची धाड:अश्लील चाळे करणाऱ्या 3 प्रेमीयुगुलांना घेतले ताब्यात