![]()
विभागीय लोकशाही दिनात दाखल होणाऱ्या प्रकरणांवर विहीत कालमर्यादेत कार्यवाही करुन अंतिम अहवाल सादर करणे, संबंधित अर्जदारास केलेल्या कार्यवाहीबाबत अवगत करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने त्यांच्याकडील प्रलंबित प्रकरणांच्या संदर्भात प्रत्यक्ष स्थळ पाहणी करुन चौकशी अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश विभागीय अप्पर आयुक्त संजय जाधव यांनी दिले आहे. विभागीय लोकशाही दिनानिमित्त आयुक्तालयाच्या सभागृहात त्यांनी सोमवारी नागरिकांच्या तक्रारींचा आढावा घेतला. लोकशाही दिनासाठी नव्याने उपस्थित नागरिकांच्या कैफीयतीही ऐकल्या. त्यानंतर पाचही जिल्ह्यातून उपस्थित विभागप्रमुखांना वरील निर्देश दिले. लोकशाही दिनात प्राप्त होणाऱ्या तक्रारींची पडताळणी करुन त्या प्रकरणांचा निपटारा होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, असे निर्देशही अपर आयुक्त संजय जाधव यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिले . ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी संबंधित विभागांनी स्थळ पाहणी करुन मुद्देनिहाय चौकशी, पडताळणी करुन सुस्पष्ट अंतिम अहवाल सादर करावेत, असे त्यांचे निर्देश आहेत. यावेळी उपायुक्त संतोष कवडे यांच्यासह महसूल, पोलिस, महापालिका, सहकार, कृषी, जलसंधारण व ऊर्जा विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष, पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीतून उपस्थित होते. या वेळी विभागातून दाखल १५ प्रकरणांवर चर्चा करुन तक्रारींच्या अनुषंगाने आढावा घेतला. गत लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणे नवीन लोकशाही दिनी सुनावणीसाठी येवू नये. न्यायप्रविष्ट अर्धन्यायिक प्रकरणांसंदर्भात अहवाल सादर करावा,असे निर्देशही या वेळी दिले. विभागीय लोकशाही दिन हा विभागीय महिला लोकशाही दिनसुद्धा असतो. परंतु त्यानुषंगाने एकही प्रकरण दाखल झाले नाही, अशी माहिती महिला व बालविकास विभागाव्दारे देण्यात आली. या माहितीवर अनेकांच्या भुवया उंचावल्या. यंत्रणांच्या मते तक्रारच प्राप्त न होणे म्हणजे सर्वकाही सुरळीत आहे, असा त्याचा अर्थ निघतो. परंतु कितीही तक्रारी केल्या तरी काहीच फरक पडत नाही, म्हणून तक्रारच करायची नाही, अशी भूमिका घेण्यात आली असले तर मग कठिण आहे.
Source link
स्थळपाहणी, वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा:महिला लोकशाही दिन;प्रकरण दाखल नाही