.

श्री भगवंत महोत्सव २०२६ निमित्त सहाव्या दिवशी आयोजित कार्यक्रमात स्थानिक कलाकारांनी आपल्या विविधांगी कलेचे अप्रतिम सादरीकरण करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ग्रुप डान्स, रिमिक्स डान्स, लोकनृत्य, लावणी, हिंदी व मराठी गीते, भक्तिगीते, एकांकिका, ऐतिहासिक नाटके, ऑर्केस्ट्रा व वादन अशा विविध सादरीकरणांनी प्रेक्षकांची मने जिंकली. शाहरुख थीम, त्रिपुरा लोकनृत्य, छावा थीम, ऑपरेशन सिंदूर ग्रुप डान्स, वेस्टर्न रिमिक्स, आदिवासी नृत्य यांना विशेष प्रतिसाद मिळाला.
भगवंत महोत्सवात स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रविवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी माजी आमदार राजेंद्र राऊत, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रणवीर राऊत, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, शिक्षणाधिकारी सचिन जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राजेंद्र राऊत म्हणाले, गेली नऊ वर्षे भगवंत महोत्सव साजरा करण्यात येत असून, विष्णूचा मूळ अवतार असलेले भगवंत हे जगातील एकमेव मंदिर आहे. त्यानंतर विष्णूचे दशावतार झाले. बार्शी तालुक्यास मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून सुमारे ५ हजार कोटींचा निधी मिळाला असून तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी सर्व अटी पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असून भविष्यात दरवर्षी शासकीय महापूजा व्हावी, ही आमची मागणी आहे. तसेच युवा अधिकाऱ्यांनी भगवंत तीर्थक्षेत्रासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. आसावरी फरताडे व धीरज शेळके यांनी केले.
ओंकार एकशिंगे व परिवार यांच्या वतीने बार्शी शहराचे आराध्य दैवत भगवंतावरील असलेल्या श्रध्देपोठी दीड किलो वजनाच्या चांदीच्या पादुका भगवंत चरणी अर्पण करण्यात आल्या. कृषी उत्पन्न बाजार समितीने दहा लाख रुपयांचा धनादेश समितीला दिला. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी बार्शीकरांचे अभिनंदन करताना सांगितले की, राऊत यांनी आग्रहाने सन्मान करून येथे बोलावले. मुख्यमंत्री दौऱ्याचे नियोजन बार्शीतील टीम व संयोजकांनी अत्यंत योग्य प्रकारे केले आहे.