Headlines

स्मशानभूमीत अघोरी पूजा, पशूंचे बळी:नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबाचा काळा कारनामा उघड; कमलेश अधिकारी विरोधात गुन्हा




नाशिकमध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या आणखी एका भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आश्रम आणि मठाच्या माध्यमातून मानसिक त्रासात असलेल्या लोकांना जाळ्यात ओढून त्यांचे आर्थिक व मानसिक शोषण करणाऱ्या कमलेश शिवकुमार अधिकारी आणि त्याच्या पत्नीविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील लऊळ गावातील मदन देवकर आणि ज्ञानेश्वर देवकर या दोन भावांच्या आई-वडिलांचे 2021 मध्ये अवघ्या एका महिन्याच्या अंतराने निधन झाले होते. या घटनेनंतर दोन्ही भाऊ मानसिक तणावाखाली होते. काहीतरी आध्यात्मिक उपाय मिळावा या हेतूने त्यांनी इंटरनेटवर शोध सुरू केला. त्यावेळी त्यांना नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील कमलेश अधिकारी याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी नाशिकमध्ये जाऊन त्याची भेट घेतली. याचाच फायदा घेत भोंदूबाबाने त्यांना भीतीच्या गर्तेत ढकलल्याचा आरोप आहे. कमलेश अधिकाऱ्याने देवकर बंधूंना त्यांच्या जमिनीवर दैवी संकट असल्याचे सांगितले. मागच्या जन्मातील पापांमुळे तुमच्या कुटुंबावर संकट आले आहे. गुप्तधन आणि अतृप्त आत्म्यांमुळेच तुमच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला, असे सांगून त्यांना घाबरवण्यात आले. तसेच दोघांवरही मृत्यूचं संकट असल्याचं सांगून त्यांच्याकडून विविध अघोरी पूजा करून घेण्यात आल्या. या सर्व प्रकारामुळे दोन्ही भाऊ पूर्णपणे त्याच्या प्रभावाखाली गेल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर भोंदूबाबाने त्यांना मध्यप्रदेशातील उज्जैन येथे नेले. तिथल्या स्मशानभूमीत जळत्या चितेजवळ 4 दिवस अघोरी पूजा करण्यात आली. या विधींमध्ये पशूंचे बळी देण्यात आल्याचा आरोप आहे. या पूजेच्या नावाखाली 1 लाख 50 हजार रुपये उकळण्यात आले. त्यानंतर नांदगाव तालुक्यातील पिंपळखेड येथील आश्रमातही पुन्हा अघोरी विधी करण्यात आले. एवढेच नाही तर पीडितांना दारू प्रसाद म्हणून पाजण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे देवकर बंधूंची 2 एकर शेतजमीन फसवणूक करून स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप आहे. मठ उभारण्यासाठी जमीन आवश्यक असल्याचे सांगत त्यांची फसवणूक करण्यात आली. त्यानंतर दोन्ही भावांना त्र्यंबकेश्वर येथील आश्रमात जबरदस्तीने ठेवण्यात आले. त्यांच्याकडून घरातील कामे करून घेत विविध प्रकारे शोषण करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या संपूर्ण प्रकारात कमलेश अधिकाऱ्याच्या पत्नीचीही मदत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. प्रकरणाची गंभीर दखल या त्रासाला कंटाळून अखेर देवकर बंधूंनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. समितीच्या मदतीने त्यांनी इंदिरानगर पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. प्रभारी पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने तपास सुरू केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक युवराज शिरसाठ करत आहेत. दरम्यान, अशाच प्रकारे आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी तात्काळ पोलिस किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *