![]()
राज्यात विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर, सध्या महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठी रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषतः रायगडच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू असतानाच, ‘देवगिरी’ बंगल्यावरील बैठकीत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्यात वाद झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र, या वृत्तानंतर आज दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे प्रसारमाध्यमांसमोर येत आपली बाजू स्पष्ट केली आणि या कथित वादावर सविस्तर स्पष्टीकरण देऊन सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार सुनील तटकरे म्हणाले, राज्यात 17 विधान परिषदेच्या जागांवरुन महायुतीत समन्वयाने चर्चा सुरु आहे. या निवडणूकांवरुन आमच्यातील कोणी कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. येऊ घातलेल्या निवडणूकात महायुतीला निर्भेळ यश मिळवायचे असल्याने चर्चा होईपर्यंत काही कालावधी जात असतो. उद्यापर्यंत आम्हाला वेळ आहे. उद्या दुपारपर्यंत जागाचे नक्की होईल, अशी माहिती तटकरे यांनी दिली. हम साथ साथ है…काही वाद नाही त्यानंतर छगन भुजबळ म्हणाले, केवळ मला बोलायचे असल्याने मी त्याला थांबायला सांगितले, आता आम्ही एकत्र आहोता. ‘हम साथ साथ है…काही वाद नाही…’ कधी कोणी जास्त बोलले तर आपण बोलतो थांबा जरा तसे झाले होते, असे म्हणत पक्षाच्या बैठकीत दोघांमध्ये झालेल्या वादावर स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिले आहे. बैठकीत काय झाले होते? दरम्यान, मंगळवारी, 26 मे रोजी ‘देवगिरी’ बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. मुंबईत असूनही ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने सुरुवातीलाच चर्चेला उधाण आले. या बैठकीत बोलताना पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. अजित पवार यांच्या पश्चात आम्ही पक्ष वाढवण्याचे काम करत आहोत. मात्र जेव्हा आमच्यावर टीका होते, तेव्हा पक्षातील अन्य कोणताही नेता त्याचे खंडन करण्यासाठी पुढे येत नाही. आम्ही दोघेच नेहमी टीकेचे धनी का? असा उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर आक्षेप घेत, ‘हे मुद्दे इथे मांडू नका, आता जे झाले ते विसरून जा,’ असे सांगत छगन भुजबळ यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि तणाव निर्माण झाला. याच बैठकीत आणखी काही नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. सुनील तटकरे यांचे भाषण सुरू असतानाच पार्थ पवार अचानक बैठकीतून उठून निघून गेले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. याशिवाय, बैठकीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनीही मित्रपक्ष असलेल्या भाजपबद्दलची आपली खंत उघडपणे बोलून दाखवली. भाजपकडे वारंवार मागणी करूनही ते आपल्याला अर्थखाते देत नसल्याची मोठी नाराजी त्यांनी यावेळी व्यक्त केली. एकूणच, पक्षांतर्गत कलह आणि मित्रपक्षाकडून होत असलेली कोंडी यामुळे देवगिरी बंगल्यावरील ही बैठक चांगलीच गाजली.
Source link
'हम साथ साथ है… काही वाद नाही':छगन भुजबळ आणि सुनील तटकरेंनी फेटाळल्या वादाच्या चर्चा; मीडियासमोर नेमके काय म्हणाले?