Headlines

हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवावर निवडणुकांचे सावट!:यंदा महोत्सव साजरा करणे अशक्य, महसूल अधिकाऱ्यांचे जिल्हा प्रशासनाला पत्र




हिंगोली तालुक्यातील विशेष मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम तसेच ग्रामपंचायत निवडणूक व संभाव्य जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल यंत्रणेवर मोठा ताण येणार असून यामुळे हिंगोलीचा ऐतिहासिक दसरा महोत्सव साजरा करणे अशक्य असल्याचे पत्र उपविभागीय अधिकारी तथा दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष समाधान घुटुकडे तसेच तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी सोमवारी ता ३ जिल्हा प्रशासनाकडे दिले आहे. हिंगोली येथील ऐतिहासिक दसरा महोत्सव देशातील दुसरा दसरा महोत्सव म्हणून प्रसिद्ध आहे. दसरा महोत्सव रामलीला कार्यक्रम मुख्य आकर्षण असते याशिवाय कृषी व औद्योगिक प्रदर्शनी मध्ये दररोज हजारो नागरिकांची गर्दी होते. तर विजयादशमीच्या दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम डोळ्याची पारणे फेडणारा ठरतो. हा कार्यक्रम पाहण्यासाठी सुमारे एक लाखापेक्षा अधिक भाविक हिंगोली मध्ये येतात. दरम्यान दसरा महोत्सव उपविभागीय अधिकारी हे महोत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्या स्थापन करून साजरा केला जातो. दरम्यान यावर्षीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाच्या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी पत्र दिले आहे. सध्या भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे महसूल यंत्रणा या कामात दिवस-रात्र व्यस्त आहे. या अंतर्गत हिंगोली विधानसभा मतदार संघात जवळपास 26455 विसंगती आणि 17000 न प्राप्त होणारे फॉर्मवर काम सुरू आहे. त्यावर सुनावणी घेऊन त्याचे निराकरण करणे कालमर्यादेत आवश्यक आहे. तसेच प्रारूप प्राप्त यादीवर दावे हरकती घेऊन 19 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करायची आहे. याशिवाय राज्य निवडणूक आयोगामार्फत हिंगोली तालुक्यातील 95 ग्रामपंचायत निवडणुकांचे कामही प्रगतीपथावर आहे. यामध्ये प्रभाग रचना, प्रभाग आरक्षण आणि मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये 775 सदस्य आणि 95 सरपंच निवडून द्यायचे आहेत. त्यासाठीही मतदार याद्यांवरील दावे हरकती घेणे आणि निवडणुकीची तयारी करणे आवश्यक आहे. त्यामुळे महसूल यंत्रणेवर कामाचा मोठा ताण आहे. तसेच राज्य निवडणूक आयोगामार्फत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठीही माहिती मागवण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे येत्या काळात या निवडणुका लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबींचा विचार करून उपविभागीय अधिकारी हिंगोली, अध्यक्ष सार्वजनिक दसरा महोत्सव समिती, तहसीलदार हिंगोली आणि समितीमार्फत सार्वजनिक दसरा महोत्सव 2026 साजरा करण्याचे काम राबविणे शक्य होणार नाही. दसरा महोत्सवाची नवीन कार्यकारणी गठीत करून दसरा महोत्सव साजरा करावा अशी सूचना धर्मादाय आयुक्त कार्यालयाला द्यावी अशी विनंती ही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *