Headlines

हिंगोलीत दिड लाखाच्या कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या:कुटुंबावर दुःखाचा डोंगर; हट्टा पोलिस ठाण्यात नोंद




वसमत तालुक्यातील गुंडा येथील तरुण शेतकऱ्याने नापीका व दिड लाख रुपये कर्जाला कंटाळून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात बुधवारी ता. २० अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील गुंडा येथील दत्ता दिगांबर चव्हाण (३२) यांना त्यांच्या वडिलांच्या नावे गुंडा शिवारात चार एकर शेत आहे. शेतात पारंपारीक पिके घेतली जातात. या शेतावर त्यांनी भारतीय स्टेट बँक शाखा जवळाबाजार येथून दिड लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या शेतीच्या उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र मागील काही वर्षात सततची नापिकी यामुळे कर्ज कसे फेडावे तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा असा प्रश्‍न त्यांच्या समोर उभा राहिला होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. दरम्यान, शेतात भुईमुग काढणीचे काम सुरु असल्याने रात्रीच्या वेळी ते शेतात गेले होते. मात्र सकाळपर्यंत ते घरी परतलेच नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला होता. तसेच परिसरातील शेतात कामासाठी आलेल्या महिलांनी देखील त्यांच्या शेतात पाहणी केली असता दत्ता यांचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, उपनिरीक्षक शेख हकीम यांच्या पथकाने रुग्णालयात जाऊन पाहणी केली. या प्रकरणी भागवत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीवरून हट्टा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत दत्ता चव्हाण यांच्या पश्‍चात आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एकं मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून घरातील कर्ता पुरुष गेल्याने चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *