![]()
हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांसह खाजगी शाळांमध्ये सोमवारी ता. १५ नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. नव प्रवेशितांना गुलाब पुष्प, गणवेश पाठयपुस्तके देण्यात आली तर काही ठिकाणी मुलांच्या पायाचे ठसे घेऊन शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी शाळामध्ये अल्हाददायक वातावरण दिसून आले. हिंगोली जिल्हयातील सुमारे 1 हजार शाळांमधून नवीन शैक्षणिक वर्षात शाळा प्रवेशोत्सवाची तयारी करण्यात आली होती. त्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सजल्या होत्या. बहूतांश शाळांच्या प्रवेशद्वारावर आकर्षक रंगीबेरंगी फुगे लावण्यात आले होते. याशिवाय विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी गुलाबाची फुले आणण्यात आली होती. दरम्यान, अंतूलेनगर येथील जिल्हा परिषद शाळेत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फुल, नवीन गणवेश, पाठ्यपुस्तके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नव प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रातिनिधीक स्वरूपात पायाचे ठसे घेऊन त्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. याशिवाय जिल्ह्यातील इतर ठिकाणीही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आली. काही ठिकाणी विद्यार्थ्यांची गावातून मिरवणुकही काढण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेचे वातावरण अल्हाददायक झाले होते. विद्यार्थी देखील हसत खेळत शाळेत प्रवेशीत झाले. जिल्ह्यात शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार असून याबाबतच्या सुचनाही जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
Source link
हिंगोलीत शाळांमध्ये आजपासून वाजली पहिली घंटा:'पाऊलठसे' घेत नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत