Headlines

हिंगोली शहरात अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पकडला:12.12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, चालकाविरुद्ध गुन्हा




हिंगोली शहरातील नांदेड नाका भागात पोलिसांच्या पथकाने सोमवारी ता. 3 पहाटेच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले असून 12.12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी टिप्पर चालका विरुध्द हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी टिप्पर चालकास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातून वाळू घाटावरून अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी महसूल व पोलिस विभागाच्या वतीने कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथके स्थापन करण्यात आली आहेत. स्थानिक पोलिस ठाण्यांची १३ पथके व गुन्हे शाखेची दोन पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, हिंगोली शहरात एका टिप्पर मधून अवैध वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, उपनिरीक्षक गजानन साखरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, जामदार अशोक धामणे, अर्जुन यादव यांच्या पथकाने आज पहाटे चार वाजल्या पासून नांदेडनाका येथे वाहन तपासणी मोहिम सुरु केली होती. यामध्ये पावने सहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी एक टिप्पर थांबविले. पोलिसांनी टिप्पर चालक शेख असलम (रा. वाशीम, ह. मु. बावनखोली हिंगोली) याच्याकडे चौकशी केली असता त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. या शिवाय वाळू वाहतूकीच्या पावत्याही दाखविता आल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांनी टिप्पर व वाळू जप्त केली आहे. या प्रकरणी जमादार यादव यांच्या तक्रारीवरून टिप्पर चालक शेख असलम याच्या विरुध्द हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक साखरे पुढील तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *