![]()
दहा दिवसांपासून वारंवार १०१ अंश फॅरेनहाइटपेक्षा अधिक ताप, सांधेदुखी, अंगावर पुरळ आणि प्रचंड थकवा जाणवत असल्याने उपचार घेणाऱ्या १० वर्षीय मुलीच्या आजाराचे अखेर निदान झाले. पुण्यातील खराडी येथील एका रुग्णालयात तपासणी केल्यानंतर तिला ‘मॅक्रोफेज अॅक्टिव्हेशन सिंड्रोम’ (एमएएस) या दुर्मिळ आणि गंभीर स्थितीचे निदान झाले. उपचारानंतर मुलीची प्रकृती आता स्थिर असून ती बरी झाली आहे. रुग्णालयातील बालरोग व बाल अतिदक्षता विभागाचे तज्ज्ञ डॉ. अमर भिसे यांच्या नेतृत्वाखाली तिची तपासणी करण्यात आली. रक्त तपासणीत फेरिटिनची पातळी ५ हजारांपेक्षा अधिक आढळली. तसेच लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स या तिन्ही प्रमुख रक्तपेशींची संख्या कमी झाली होती. यकृताशी संबंधित एसजीओटी/एएसटी आणि एसजीपीटी/एएलटी या एन्झाइम्सची पातळीही २०० युनिट प्रतिलिटरपेक्षा अधिक वाढली होती. सुरुवातीला विविध संसर्गजन्य आजारांची शक्यता तपासण्यात आली. रक्ताशी संबंधित गंभीर आजारांचा संशय दूर करण्यासाठी अस्थिमज्जा तपासणीही करण्यात आली. मात्र, रक्ताचा कर्करोग किंवा लसिकाग्रंथींचा कर्करोग आढळला नाही. लक्षणे, रक्त तपासण्या आणि शरीरातील वाढलेला दाह यांचा एकत्रित विचार केल्यानंतर एमएएसचे निदान करण्यात आले. पुढील तपासणीत या समस्येमागे ‘सिस्टेमिक जुवेनाइल इडिओपॅथिक आर्थ्रायटिस’ हा आजार असल्याचे स्पष्ट झाले. या आजारात दीर्घकाळ ताप, सांधेदुखी आणि त्वचेवर पुरळ येऊ शकते. त्याची गंभीर गुंतागुंत म्हणून एमएएस होऊ शकतो. मुलीला बाल अतिदक्षता विभागात दाखल करून उच्च मात्रेतील स्टेरॉइड्स देण्यात आले. काही आठवड्यांत ताप कमी झाला आणि रक्त तपासण्यांमध्ये सुधारणा झाली. पुढील सहा ते आठ आठवड्यांत औषधांची मात्रा टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आली. सुमारे दोन महिने निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर सध्या तिची प्रकृती चांगली आहे. अनेक दिवस ताप कायम राहणे, त्यासोबत सांधेदुखी, पुरळ, अतिथकवा किंवा रक्त तपासणीत असामान्य बदल दिसल्यास पालकांनी केवळ सामान्य ताप समजून घरगुती उपचार न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे डॉ. भिसे यांनी सांगितले.
Source link
10 वर्षीय मुलीला 10 दिवस ताप; फेरिटिन 5 हजारांवर:दुर्मिळ ‘मॅक्रोफेज अॅक्टिव्हेशन सिंड्रोम’चे निदान