Headlines

1,400 विद्यार्थ्यांनी अनुभवली सिंधू संस्कृती:सटाण्यातील डिव्हाईन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये उपक्रमाचे आयोजन‎




बागलाण तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात प्रथमच विद्यार्थ्यांना भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व वारशाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा म्युझियम ऑन व्हील्स‌् तसेच प्राचीन सिंधू संस्कृतीचा चित्ररथ व ऐतिहासिक वस्तू संग्रहालय हा अभिनव उपक्रम श्रीशक्ती शैक्षणिक संस्थेच्या डिव्हाईन इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सटाणा येथे आयोजित करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. नवीन शैक्षणिक धोरणात सिंधू संस्कृतीचा समावेश असल्याने विद्यार्थ्यांना इतिहासाचे ज्ञान पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून भारतीय संस्कृतीचा गौरवशाली वारसा समजावा आणि इतिहास व पुरातत्त्व विषयाबद्दल अभ्यासाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरण, डिजिटल माध्यमे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना हजारो वर्षांपूर्वीच्या भारतीय संस्कृतीचा जिवंत अनुभव घेता आला. शहरातील सहा शाळांमधील सुमारे १,४०० विद्यार्थ्यांनी या फिरत्या संग्रहालयाला भेट देत भारतीय संस्कृती आणि पुरातत्त्वीय वारशाची माहिती प्रत्यक्ष अनुभवातून जाणून घेतली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अपूर्व हिरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा अनुभवाधारित आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. उपक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव डॉ. दीपक सोनवणे यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे विश्वस्त जे. डी. दातरे, प्राचार्य सुरेंद्रकुमार हांडे, डिव्हाईन कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस. के. महाजन, मिलिंद उमरीकर आदी उपस्थित होते. फिरते संग्रहालय आकर्षण फिरत्या संग्रहालयात सिंधू-सरस्वती संस्कृतीचे वैभव आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने साकारण्यात आले होते. हडप्पा, मोहेंजोदडो, धोलावीरा, लोथल, राखीगढी आणि कालीबंगन येथील उत्खननातून सापडलेले पुरातत्त्वीय अवशेष, प्राचीन नाणी, दुर्मिळ ऐतिहासिक वस्तू याची माहिती विद्यार्थ्यांना आकर्षक पद्धतीने देण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *