![]()
शहरातील पाटीपुरा परिसरात राहणारा एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात एमडी (मेफेड्रोन) विक्रीसाठी आणत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे बुधवारी उशिरा रात्री सुरू करण्यात आलेल्या सुमारे पाच तासांच्या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी २१४ ग्रॅम एमडी, एक चारचाकी वाहन आणि मोबाईल फोन असा एकूण ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या एमडीची किंमत सुमारे ४२ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी सईद खान शरीफ खान (वय ४२, रा. पाटीपुरा, अमरावती) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांना सईद खान हा एमडीची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर काही दिवसांपासून पाळत ठेवण्यात आली होती. बुधवारी रात्री त्याला पकडण्यासाठी पाटीपुरा परिसरात सापळा रचण्यात आला. मध्यरात्री साडेबारा ते एकच्या सुमारास तो चारचाकी वाहनातून एमडी घेऊन विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे व पोलीस निरीक्षक अतुल वर यांच्या नेतृत्वातील पथकाने त्याला ताब्यात घेतले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये तब्बल २१४ ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ आढळून आला. प्राथमिक तपासात सईद खान मोठ्या प्रमाणात एमडी मागवून त्याची स्थानिक स्तरावर एक, दोन व पाच ग्रॅम अशा छोट्या प्रमाणात विकतात. ५ ते १० सेकंदांत व्यवहार पूर्ण तपासादरम्यान सईद खानला एमडीचा पुरवठा करणारी व्यक्ती शहराबाहेरील असल्याची माहिती समोर आली आहे. हा व्यवहार केवळ रोख रकमेतच केला जातो. एमडीचा पुरवठा करणारे तस्कर धावत्या वाहनातून किंवा अवघ्या पाच ते दहा सेकंदांसाठी वाहन थांबवून व्यवहार पूर्ण करतात. तसेच पुरावे मागे राहू नयेत, यासाठी ते सोशल मीडियावरील व्हॉइस कॉलचा वापर करतात. त्यामुळे या संपूर्ण अमली पदार्थ तस्करीच्या साखळीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
Source link
42 लाखांच्या एमडीसह शहरातून एकाला अटक:50 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त