Headlines

अशोक खरात प्रकरणात उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित:143 वेळा कॉल; खरातच्या पत्नीच्या नावाने गुंतवणूक केल्याचाही आरोप




अशोक खरात प्रकरणात राजकीय नेत्यांच्या सहभागानंतर आता प्रशासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे यांना या प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. खरातसोबत आर्थिक व्यवहार केल्याचा गंभीर आरोप भांडे यांच्यावर ठेवण्यात आला असून, याच कारणास्तव त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभिजित भांडे यांच्या निलंबनाचे आदेश दिल्याचे समजते. तपासादरम्यान अशोक खरात आणि भांडे यांच्यातील संभाषणाचे कॉल रेकॉर्ड्स समोर आले असून, त्यातून त्यांचे आर्थिक लागेबांधे स्पष्ट झाल्याने ही कडक कारवाई करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या भांडे यांना हे आर्थिक व्यवहार चांगलेच भोवले असून, या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अशोक खरातला तब्बल 143 वेळा लावले कॉल अशोक खरात आणि उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे यांच्यातील धक्कादायक कॉल रेकॉर्ड्स समोर आले असून, 4 एप्रिल 2025 ते 15 मार्च 2026 या कालावधीत त्यांच्यात तब्बल 143 वेळा संवाद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या संभाषणात खरातने भांडे यांना 83 वेळा, तर भांडे यांनी खरातला 60 वेळा कॉल केले होते. एकूण 10,037 सेकंद म्हणजेच जवळपास 3 तास चाललेल्या या चर्चेत 7 जुलै 2025 रोजी 10 कॉल, तर 23 नोव्हेंबर 2025 रोजी एकाच दिवसात 14 कॉल झाल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे 7 ऑगस्ट 2025 रोजी त्यांच्यात सलग 11 मिनिटे प्रदीर्घ चर्चा झाली होती, ज्यामुळे त्यांच्यातील संबंधांच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अभिजीत भांडेंची चौकशी होण्याची शक्यता या सबळ पुराव्यांच्या आधारे महसूलमंत्र्यांनी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे यांच्या निलंबनाचे आदेश दिले असून प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अशोक खरातसोबतच्या या सातत्यपूर्ण संपर्कामुळे भांडे यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप होत आहेत. रुपाली चाकणकर यांच्यानंतर आता या प्रकरणात भांडे यांचीही सखोल चौकशी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. खरात प्रकरणातील या नव्या खुलाशामुळे आता आणखी कोणते मोठे धागेदोरे समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशोक खरातसोबत आर्थिक संबंध उघडकीस अशोक खरातशी असलेल्या कथित आर्थिक हितसंबंधांमुळे उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरातच्या पत्नी आणि मुलीच्या नावावर असलेल्या जमिनींमध्ये भांडे यांनी गुंतवणूक केल्याचा प्राथमिक आरोप असून, खरातशी संबंधित अनेक संशयास्पद व्यवहारांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असल्याचे बोलले जात आहे. भांडे यांच्यावर झालेल्या या कडक कारवाईमुळे महसूल विभागातील इतर अधिकारी, ज्यांचे खरातशी जवळचे संबंध होते, त्यांच्यामध्ये आता भीतीचे वातावरण पसरले आहे. शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप असलेल्या अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, मुख्यमंत्र्यांनी यातील सर्व संबधितांची सखोल चौकशी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा सज्जड इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर आता खरातच्या निकटवर्तीयांचे धाबे दणाणले असून, तपासाचा हा फेरा नक्की कोणापर्यंत पोहोचणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *