Headlines

अमरावती पोलिसांना मिळाले 'कुलिंग जॅकेट':उन्हाळ्यात वाहतूक नियंत्रण सोपे करण्यासाठी अभिनव उपाय




अमरावती शहरात वाढत्या तापमानामुळे वाहतूक पोलिसांना आता ‘कुलिंग जॅकेट’चा दिलासा मिळाला आहे. भर उन्हात चौकाचौकात वाहतूक नियंत्रण करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही जॅकेट अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. यामुळे त्यांना उन्हाळ्यात कर्तव्य बजावणे सोपे होणार आहे. अमरावतीचे पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. शहरातील वाहतूक शाखेतील तिन्ही विभागांमधील सुमारे दीडशे वाहतूक पोलिसांना ही जॅकेट वितरित करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त, तातडीच्या सेवांमध्ये (११२ क्रमांक) कार्यरत असलेल्या सुमारे शंभर अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही ही ‘कुलिंग जॅकेट’ पुरवण्यात आली आहेत. उन्हाची तीव्रता वाढत असताना वाहतूक पोलिसांना दीर्घकाळ रस्त्यावर उभे राहून काम करावे लागते. यामुळे उष्माघात, थकवा आणि शरीरातील पाण्याची कमतरता यांसारख्या समस्या निर्माण होतात. ‘कुलिंग जॅकेट’मुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते, ज्यामुळे उन्हाचा त्रास कमी जाणवतो. ही ‘कुलिंग जॅकेट’ इलेक्ट्रिक असून, एकदा चार्ज केल्यानंतर दिवसभर वापरता येतात. जॅकेटमध्ये असलेल्या ‘कुलिंग फॅन’मुळे कितीही उष्णता असली तरी आतून थंडावा मिळतो, ज्यामुळे पोलिसांना काम करताना मोठी मदत होते. या उपक्रमामुळे पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. वाहतूक हवालदार अमित गोफणे यांनी प्रतिक्रिया दिली की, “या प्रचंड गर्मीत कुलिंग जॅकेटचा मोठा फायदा होत आहे. सतत उन्हात ड्युटी करताना शरीराला थंडावा मिळत असल्याने काम करणे सोपे झाले आहे.” नागरिकांनीही या अभिनव प्रयोगाचे कौतुक केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *