![]()
जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या, तक्रारी आणि सूचना आता अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक पद्धतीने प्रशासनापर्यंत पोहोचवता याव्यात, यासाठी अकोला पोलिस दलाने एक आधुनिक पाऊल उचलले आहे. येथील पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून ‘एसपी-ई-संवाद’ही ऑनलाईन मीटिंगची अभिनव सुविधा नव्याने सुरू करण्यात आली आहे. या आधुनिक सुविधेमुळे आता नागरिकांना आपल्या समस्या किंवा निवेदने मांडण्यासाठी थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात खेटे मारण्याची गरज भासणार नाही. सध्या दररोज सकाळी १२ ते १ आणि संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत पोलिस अधीक्षकांना भेटण्यासाठी अकोला शहर आणि ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक येतात. आलेल्या प्रत्येक नागरिकाशी पोलीस अधीक्षक स्वतः संवाद साधतात आणि समस्या ऐकून घेतात. परंतु नागरिकांचा प्रवासातील वेळ आणि खर्च कमी करण्यासाठी आता ही ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांचा मौल्यवान वेळ आणि प्रवास खर्च वाचवणे हा आहे. अकोला पोलिस दलातर्फे नागरिकांना अधिक कार्यक्षम व लोकाभिमुख सेवा देण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात. त्यातीलच हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या ऑनलाइन सुविधेचा उपयोग करावा, जेणेकरून वेळेची व इंधनाची बचत होईल, असे आवाहन अकोला पोलिसांकडून करण्यात आले आहे. इंधन बचतीसाठी पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत पेट्रोल व डिझेल इंधनाची बचत करणे हा यामागील हेतू आहे. ग्रामीण आणि विशेषतः दुर्गम भागातील नागरिकांना या सुविधेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. घरबसल्या पोलिस प्रशासनाशी संपर्क साधणे आता अधिक सोयीचे होणार आहे. नागरिक आता त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार ऑनलाइन मीटिंगसाठी वेळ निश्चित करून प्रशासनाशी ई-संवाद साधू शकतात. असा करा प्रणालीचा वापर या ऑनलाइन सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना अत्यंत सोपी प्रक्रिया पार पाडावी लागेल. अकोला पोलिसांकडून उपलब्ध अधिकृत क्यूआर कोड स्कॅन करा किंवा https://akolapolicee visit-code.github.io /SP-e-Sanvad/ या वेब-लिंकचा वापर करा. लिंक ओपन झाल्यानंतर तेथे विचारलेली तुमची आवश्यक ती सर्व माहिती भरा. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना त्यांनी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाइन मीटिंगची लिंक प्राप्त होईल. निर्धारित वेळेनुसार प्राप्त लिंकवरून थेट पोलिस अधीक्षकांशी ऑनलाइन संवाद साधून आपली तक्रार, निवेदन किंवा सूचना मांडता येईल.
Source link
‘एसपी-ई-संवाद’द्वारे घरबसल्या साधता येणार पोलिसांशी संपर्क:नागरिकांचा वेळ आणि प्रवासाचा त्रास वाचवण्यासाठी ऑनलाइन मीटिंगची सुविधा