![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनोख्या पद्धतीने त्याला प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री थेट ‘रॉयल एनफिल्ड 350’ या बुलेट दुचाकीवरून विधानभवनात दाखल झाले. त्यांच्या या वेगळ्या स्टाईलची सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या या बुलेट स्वारीनंतर विविध प्रतिक्रिया उमटत असून, वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही आपल्या खास शैलीत फडणवीसांचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः बुलेट चालवत विधानभवनात पोहोचले होते. त्यांच्या मागे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार बसले होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचा सुरक्षा ताफाही दुचाकींवरच होता. या संपूर्ण दृश्यामुळे विधानभवन परिसरात वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या कृतीकडे अनेकांनी साधेपणाचे उदाहरण म्हणून पाहिले. या संपूर्ण घडामोडीवर प्रतिक्रिया देताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, हा अत्यंत चांगला निर्णय असून अशा उपक्रमांचे अनेक फायदे होऊ शकतात. जपानसारख्या देशांमध्ये मंत्री सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात, याची आठवण करून देत त्यांनी फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले. मुख्यमंत्री बाईकवरून आले आणि नितीन गडकरी सार्वजनिक वाहतुकीने आले. काल फडणवीसांची स्टाईल पाहून वाटलं, ते कॉलेजला चालले आहेत की विधानभवनात? अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली. डंके की चोट पर… फडणवीसांसमोर विजय फिका पडला, असेही ते म्हणाले. विरोधकांवरही अप्रत्यक्ष निशाणा दरम्यान, देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने विरोधकांनी सरकारवर टीका सुरू केली आहे. पेट्रोल 3 रुपये प्रति लिटर तर डिझेल 3.11 रुपये प्रति लिटरने महागले आहे. यावर बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी जागतिक परिस्थितीचा दाखला दिला. पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 450 रुपये लिटरपर्यंत पोहोचल्याचे सांगत त्यांनी भारताची परिस्थिती तुलनेने चांगली असल्याचा दावा केला. जगात मोठे संकट आहे, पण आपली मान ताठ आहे. सशाच्या शिकारीला जाताना वाघाचे काळीज असावे लागते, असे म्हणत त्यांनी विरोधकांवरही अप्रत्यक्ष निशाणा साधला.
Source link
डंके की चोट पर… फडणवीसांसमोर विजयही फिका:कॉलेजला जात होते की विधानभवनात?; बुलेट स्वारीवर गुणरत्न सदावर्ते फिदा