![]()
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात शुक्रवार, 15 मे रोजी खरीप हंगामपूर्व तयारी आढावा संपन्न झाली. या बैठकीत शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई, पीक कर्ज वितरणातील अडचणी आणि बियाण्यांच्या संभाव्य लिंकिंगप्रकाराचा मुद्दा उपस्थित करत खरीप हंगामात खतटंचाई आणि पीक कर्जाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भूमिका मांडली. खरीप हंगाम तोंडावर असताना जिल्ह्यात रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. युएस ॲग्री सीड्सचे 1767 आणि तुळशी सीड्सचे ‘कबड्डी’ या वाणांना मोठी मागणी असून भविष्यात बियाण्यांमध्येही लिंकिंगचा प्रकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभागाने वितरण व्यवस्थेवर प्रभावी नियंत्रण ठेवावे, अशी सूचना दानवे यांनी केली. मशागतीपूर्वीच शेतकऱ्यांना आर्थिक गरज भासत असल्याने जूनपूर्वी पीक कर्ज उपलब्ध होणे आवश्यक आहे. मात्र राज्य सरकारने ३० जूनपूर्वी कर्जमाफी करण्याची घोषणा केल्याने शेतकऱ्यांसमोर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवीन पीक कर्जासाठी जुने कर्ज भरल्यास अनेक शेतकरी कर्जमाफीच्या निकषाबाहेर जाऊ शकतात, ही गंभीर बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री संजय शिरसाट व मंत्री अतुल सावे यांनी राज्य सहकार समोर ही भूमिका मांडावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली. दरम्यान, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शहर व जिल्ह्यातील विविध प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहरातील वाढती गुन्हेगारी, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, जिल्ह्यात सुरू असलेली वाळू तस्करी आणि अवैध वाळू उपसा याकडे दानवेंनी प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या विविध प्रकल्पांच्या देखभाल व व्यवस्थापनासाठी निधीअभावी अडचणी निर्माण झाल्या आहे. या प्रकल्पांच्या देखभालीसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही अंबादास दानवेंनी या बैठकीत केली.
Source link
खरीप आढावा बैठकीत अंबादास दानवेंचा आक्रमक पवित्रा:खतटंचाई आणि बियाणे लिंकिंगवरून प्रशासनाला इशारा; कर्जमाफीवरूनही सरकारवर टीका