Headlines

महिला काँग्रेसचे पुण्यात आंदोलन, मोदी सरकारला दिला इशारा:पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ कमी करा, अन्यथा खुर्ची खाली करा: स्वाती शिंदे




पुणे शहर महिला काँग्रेसने शुक्रवारी पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या दरांविरोधात आंदोलन केले. यावेळी पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांनी मोदी सरकारला इंधन दरवाढ कमी करण्याचा किंवा सत्तेतून पायउतार होण्याचा इशारा दिला. दरवाढ कमी न केल्यास आंदोलने अधिक तीव्र केली जातील, असेही त्यांनी म्हटले. कॅम्प भागातील कांचन सर्व्हिस पेट्रोल पंपासमोर हे आंदोलन करण्यात आले. महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक प्रिया वंदनाजी आणि स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. स्वाती शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये भाजपने प्रचारासाठी हजारो लिटर इंधन वापरले, तर पंतप्रधान मोदींनी विमानाने प्रवास केला. इंधनवाढ होऊ देणार नाही, असे खोटे आश्वासन देऊन जागतिक स्थितीची माहिती असतानाही मोदींनी इंधनाची आणि पैशांची उधळपट्टी केली. निवडणुका संपताच जनतेला महागाईच्या खाईत लोटून पंतप्रधान परदेश दौऱ्यावर निघून गेले, ही कृती संतापजनक असल्याचे शिंदे म्हणाल्या. महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक प्रिया वंदनाजी यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ते परदेशात थंड हवेच्या ठिकाणी जाऊन गुंतवणुकीचे करार करतात, पण त्यातून काहीही साध्य होत नाही. उलट, गेल्या तीन महिन्यांत विदेशी गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटींची गुंतवणूक काढून घेतली आहे. ही माहिती लपवून मोदीजी पाच देशांच्या दौऱ्यावर निघून गेले आहेत, असे वंदनाजी म्हणाल्या. देशासमोरील आर्थिक संकट कसे सोडवणार, हे संसदेत सांगावे अशी मागणीही त्यांनी केली. आंदोलकांनी ‘ट्रंप बोले, मोदी डोले’, ‘परदेश दौऱ्यात मोदी व्यस्त, जनता त्रस्त’, ‘लोकांसांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण’ अशा घोषणा दिल्या. या आंदोलनात अनिता मकवाना, अंजली सोलापुरे, प्राजक्ता जाधव, कल्पना शिंदे, ज्योती अडागळे, रेखा जैन, नसीम शेख, जया गोयल, मीना शेंडगे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *