![]()
लग्नसमारंभ म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते पाहुण्यांच्या स्वागतासाठी बांधले जाणारे फेटे, बडेजाव.. मात्र, या परंपरेला फाटा देत खंबाळे (ता. सिन्नर) येथील आंधळे व सोनोशी (ता. संगमनेर) येथील गिते परिवाराने एका अनोख्या उपक्रमातून समाजासमोर नवा आदर्श ठेवला
.
सोनोशी येथील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब गिते यांचे चिरंजीव बाळासाहेब व अनिल आंधळे यांची कन्या शुभांगी यांचा विवाह सोहळा नुकताच नांदूर शिंगोटे येथे पार पडला. या सोहळ्यात आलेल्या प्रत्येक पाहुण्याला महात्मा गांधी यांचे ‘सत्याचे प्रयोग’, उत्तम कांबळे यांचे ‘आई समजून घेताना’, गोविंद पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता?’, अच्युत गोडबोले यांचे ‘किमयागार’ आणि अरविंद जगताप यांच्या ‘पत्रास कारण की’ यांसारखी वैचारिक पुस्तके देण्यात आली. विशेष म्हणजे, या परिवाराने तीन वर्षांपूर्वी लग्नात ११११ आंब्यांच्या रोपांचे वाटप करून पर्यावरण रक्षणाचा संदेशही दिला होता. ^ तरुण पिढीसह सर्वच जण मोबाईल व टीव्हीमध्ये व्यस्त असतात त्यांना पुन्हा प्रत्यक्ष पुस्तकाकडे वळवणे आवश्यक आहे. पुस्तक मिळाल्यावर ते वाचण्याची उत्सुकता निर्माण होते, ज्यामुळे हरवत चाललेली वाचन सवय निर्माण होऊ शकते. क्षणिक मानापेक्षा कायमस्वरूपी ज्ञान अधिक उपयोगी आहे. लग्न कार्यात समाजाप्रती बांधिलकी व्यक्त करण्याची एक संधी आहे, त्यातून पुस्तके वाटण्याची कल्पना सुचली. – हरिभाऊ गिते, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी.
प्लास्टिकला फाटा : फ्लेक्स किंवा प्लास्टिक बॅनरऐवजी पारंपरिक फलक लेखनाचा वापर. वेळेचे भान : लग्न सोहळा ठरलेल्या मुहूर्तावर आणि वेळेत पार पाडून वेळेचा अपव्यय टाळला. गर्दीवर नियंत्रण : स्टेजवर होणारी अनावश्यक गर्दी टाळून सोहळ्याचे गांभीर्य टिकवून ठेवले. सामाजिक कृतज्ञता : ‘विद्यार्थी सहाय्यक समिती, पुणे’ या संस्थेला भोजन निधी देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार. पर्यावरणाशी नाते : यापूर्वीच्या सोहळ्यात ११११ आंब्यांच्या रोपांचे वाटप करून निसर्ग संवर्धनाचा संदेश.