![]()
अक्कलकोट “विदर्भ आणि नागपुरात स्वामींचे अनेक निस्सीम भक्त आहेत, त्यांपैकीच मी आणि माझे कुटुंबीय आहोत. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री म्हणून देशात रस्ते प्रकल्पांचे जाळे विणताना सोलापूर ते अक्कलकोट या चौपदरीकरणाचे काम अत्यंत कमी कालावधीत पूर्ण केले. या माध्यमातून स्वामी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुखकर प्रवासाची सोय उपलब्ध झाली असून, या लोकसेवेतून मला स्वामी सेवेचे मानसिक समाधान लाभले आहे,” असे भावोद्गार केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी काढले. आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना ना. गडकरी म्हणाले की, मी जेव्हा राज्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री होतो, तेव्हा माझी आई अक्कलकोटला दर्शनासाठी आली होती. त्या काळी सोलापूर-अक्कलकोट-गाण गापूर रस्ता अत्यंत खराब होता. हा रस्ता नीटनेटका आणि चौपदरी व्हावा, अशी इच्छा आईने व्यक्त केली होती. आज या महामार्गामुळे आईचे ते स्वप्न पूर्ण झाल्याचे मोठे समाधान आहे. ना. नितीन गडकरी यांनी अक्कलकोट दौऱ्यात श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात जाऊन स्वामींचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते गडकरींचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद आणि प्रतिमा देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी नागपूर येथील स्वामी धामच्या नूतन उपक्रमांच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. मंदिर समितीकडून सन्मान यावेळी जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत, कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला खासदार ज्योतीताई वाघमारे, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोटे, महापौर विनायक कोंड्याल, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, सौरभ मोरे, मनोज निकम, पुरोहित अप्पू पुजारी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
लोकसेवेतून घडली स्वामी सेवा; आईचे स्वप्नही पूर्ण:अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात नितीन गडकरींनी व्यक्त केल्या भावना