![]()
इंडिया टुडे समूहाच्या ‘तक’ वाहिनीचे व्यवस्थापकीय संपादक मिलिंद खांडेकर यांनी शनिवारी पुण्यात सांगितले की, गुगल माहितीची लायब्ररी होती, तर चॅटजीपीटीसारखी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधने थेट उत्तरे देणारे प्राध्यापक बनले आहेत. यामुळे माहिती मिळवण्याची आणि बातम्या वाचण्याची पद्धत वेगाने बदलत असून, पत्रकारांनीही एआय शिकणे काळाची गरज आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि फ्रेंड्स ऑफ व्यंकटेश यांच्या वतीने आयोजित व्यंकटेश चपळगावकर स्मृती व्याख्यानात ते ‘एआय क्रांती: पत्रकारिता बहरेल की ओसरेल?’ या विषयावर बोलत होते. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे आणि संघाचे सरचिटणीस मंगेश फल्ले उपस्थित होते. खांडेकर यांनी स्पष्ट केले की, एआय आता लेखन, डेटा विश्लेषण, ग्राफिक्स, संगीत आणि व्हिडिओ निर्मितीही करू लागले आहे. यामुळे ‘हे काम फक्त माणूसच करू शकतो’ हा समज मोडीत निघत आहे. पूर्वी वृत्तपत्र निर्मितीत कंपोजिटर, मुद्रितशोधक, पेजमेकर अशा अनेक टप्प्यांतून काम चालायचे, जे आता संगणकावर होते. टीव्ही पत्रकारितेतही एकेकाळी सहा-सहा जणांचे पथक लागायचे, पण आता मोबाईलवरून थेट प्रक्षेपण शक्य झाले आहे. मात्र, मूळ रिपोर्टिंग, घटनास्थळी जाऊन माहिती गोळा करणे आणि बातमीचा अर्थ समजून घेणे, हे काम अजूनही माणसालाच करावे लागते, असे खांडेकर यांनी अधोरेखित केले. एआयमुळे माहितीची किंवा बातम्यांची भूक कमी होणार नाही, पण लोक बातम्या कशा ग्रहण करतात, यात मोठा बदल होत आहे. डिजिटल युगात वाचक पूर्वी वेबसाईटवर जाऊन बातम्या वाचत होते, पण आता ‘झिरो क्लिक’मुळे थेट एआयवरच माहिती मिळत असल्याने माध्यमांच्या महसुलावर परिणाम होत आहे, असेही खांडेकर यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिभा चंद्रन यांनी केले, तर स्वागत मयुरेश कोन्नूर यांनी केले. सूत्रसंचालन प्राची कुलकर्णी यांनी केले आणि आभार ब्रिजमोहन पाटील यांनी मानले.
Source link
पत्रकारांनी एआय शिकणे काळाची गरज – मिलिंद खांडेकर:स्मृती व्याख्यानात 'एआय क्रांती: पत्रकारिता बहरेल की ओसरेल?' विषयावर मत