![]()
भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणे येथे गायन, वादन आणि नृत्य या कला प्रकारात पूर्णवेळ शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल निवास व्यवस्था उपलब्ध आहे. गेल्या २५ वर्षांपासून ही सुविधा दिली जात असून, आता होतकरू विद्यार्थ्यांसाठी ‘कमवा व शिका’ योजनाही सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातून पुण्यात येऊन संगीत क्षेत्रात बी.ए. किंवा एम.ए. शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही गुरुकुल निवास व्यवस्था आहे. या विद्यार्थ्यांसाठी ८ जून २०२६ रोजी गांधर्व महाविद्यालयात निवड चाचणी घेतली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी १२ जून २०२६ पासून निवास व्यवस्था सुरू होईल. संस्थेत ‘पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर शिष्यवृत्ती योजने’अंतर्गत होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना १० ते १२ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. गुरुकुलात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञांद्वारे योगाचे शिक्षण सक्तीचे आहे. तसेच, विद्यार्थ्यांना त्यांच्या मुख्य विषयाव्यतिरिक्त इतर कलांचेही प्रशिक्षण दिले जाते; उदा. गायनात पारंगत असलेल्या विद्यार्थ्याला संवादिनी किंवा तबला वादनाचे सखोल प्रशिक्षण दिले जाते. ‘कमवा आणि शिका’ या योजनेअंतर्गत, सक्षम विद्यार्थ्यांना विद्यालयात प्रारंभिक स्तरावरील वर्ग शिकवण्याची संधी दिली जाईल. यासाठी त्यांना स्वतंत्र मानधन देण्यात येईल, अशी माहिती प्राचार्य प्रमोद मराठे यांनी दिली आहे. गुरुकुल निवड चाचणीचे अर्ज गांधर्व महाविद्यालय, पुणे येथे सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ७२७६१८१२७६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन गंधर्व महाविद्यालयाच्या उपप्राचार्या परिणिता मराठे यांनी केले आहे.
Source link
गांधर्व गुरुकुलात निवास व्यवस्थेसाठी 8 जूनला निवड चाचणी:होतकरू विद्यार्थ्यांसाठी ‘कमवा व शिका’ योजना सुरू