Headlines

विद्यार्थी सहायक समितीमध्ये कलादालनाचे उद्घाटन:शिल्पकार विवेक खटावकर म्हणाले – चित्र-शिल्प समृद्ध वारसा




विद्यार्थी सहायक समितीच्या लजपतराय विद्यार्थी संकुलात नव्याने उभारण्यात आलेल्या कलादालनाचे उद्घाटन ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना खटावकर यांनी चित्रकला आणि शिल्पकला हा देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा महत्त्वपूर्ण ठेवा असल्याचे प्रतिपादन केले. शिवाजी हौसिंग सोसायटीजवळील या संकुलात आयोजित कलाकार (आर्टिस्ट) माजी विद्यार्थी मेळाव्यात हे कलादालन सुरू करण्यात आले. खटावकर यांनी यावेळी शिल्पकलेचा वारसा सांगणाऱ्या त्यांच्या तीन पिढ्यांच्या प्रवासाचेही वर्णन केले. या प्रसंगी ज्येष्ठ चित्रकार मिलिंद मुळीक, समितीचे अध्यक्ष पद्मश्री प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, विश्वस्त तुकाराम गायकवाड, चित्रकार अश्विनी पवार, हेमंत राजहंस, प्रज्ञा सातारकर, संयोजक व विद्यार्थी विकास केंद्राचे प्रभाकर पाटील, हनुमंता जगनगडा, माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष गणेश काळे आणि सचिव मनीषा गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. विवेक खटावकर म्हणाले की, कोणतीही कला केवळ सौंदर्य अनुभवण्याचे साधन नसून, ती भारतीय संस्कृतीची ओळख जपणारी प्रभावी अभिव्यक्ती आहे. कला समाजाला संवेदनशील बनवते आणि पुढील पिढीपर्यंत संस्कार व परंपरा पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते. कल्पकता, संयम, एकाग्रता आणि समर्पण भाव कलाकाराला अधिक समृद्ध करतो. ते पुढे म्हणाले, प्रत्येक अनुभव, प्रत्येक कलाकृती आणि प्रत्येक संघर्ष कलाकाराला शिकवून जातो. कला ही आत्मशोध घेण्याची प्रक्रिया आहे. शिल्पकार आणि चित्रकार हे एका नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे आहेत. दोघांच्याही अभिव्यक्तीची माध्यमे वेगळी असली तरी भावना, संवेदना आणि सर्जनशीलतेचा आत्मा एकच असतो. समितीचे अध्यक्ष पद्मश्री प्रतापराव पवार यांनी विद्यार्थ्यांना केवळ करिअरच्या मागे न धावता आयुष्यात विविध छंद जोपासण्याचा सल्ला दिला. कला, साहित्य, क्रीडा किंवा इतर सर्जनशील उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नवी दिशा देतात. या कलादालनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. समितीने शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या कला, कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने पुढाकार घेतला असल्याचेही पवार यांनी नमूद केले. ज्येष्ठ चित्रकार मिलिंद मुळीक म्हणाले की, कला केवळ छंद किंवा अभिव्यक्तीचे माध्यम नसून ती विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविण्याची ताकदही देते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या कौशल्याचा विकास करण्यासोबतच भविष्यात करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. कलाकारांच्या कलाकृती समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्यांना योग्य बाजारपेठ मिळाली पाहिजे आणि त्यांच्या कलेला आर्थिक मूल्यही प्राप्त झाले पाहिजे, असेही मुळीक यांनी सांगितले. कला आणि व्यवस्थापन यांचा समतोल साधला तरच कलाकारांना खरी ओळख आणि स्थैर्य मिळू शकते, असे ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *