![]()
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी नीट पेपरफुटीवर मोठा संताप व्यक्त केला आहे. नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आपले आयुष्य संपवले आहे. ही आत्महत्या नाही तर या व्यवस्थेने केलेला अधिकृत खून आहे, असे त्यांन
.
देशात गत 3 मे रोजी वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली नीट परीक्षा झाली होती. पण पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आता ही परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार 21 जून रोजी होईल. फेरपरीक्षेच्या या मनस्तापावर मोठा संताप व्यक्त केला जात आहे. विशेषतः काही राज्यांत विद्यार्थ्यांनी आत्महत्याही केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अमित ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) भोंगळ आणि भ्रष्ट कारभारामुळे आज देशातील आणि महाराष्ट्रातील 22 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात लोटले गेले आहे. NEET-UG 2026 ची परीक्षा रद्द झाल्याच्या धक्क्यातून राजस्थान, दिल्ली, गोवा, उत्तर प्रदेश अशा राज्यांतून प्रामाणिक विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आपले आयुष्यच संपवले, ही आत्महत्या नाही, तर या सिस्टीमने केलेला अधिकृत ‘खून’ आहे!
वर्षानुवर्षे डोळ्यात तेल घालून, दिवस-रात्र एक करून अभ्यास करायचा, आई-वडिलांनी शेतजमीन विकून किंवा कर्ज काढून क्लासेसची फी भरायची आणि परीक्षेच्या दिवशी या शिक्षण माफियांच्या मेहेरबानीमुळे पेपर फुटतो? आणि त्यावर उपाय काय… तर परीक्षा रद्द? यापेक्षा अजून किती खालची पातळी गाठणार आहे सरकार?
पेपरफुटीचे धागेदोरे महाराष्ट्राशी जुळणे हे लज्जास्पद
अमित ठाकरे पुढे म्हणाले, या संपूर्ण घोटाळ्याचे धागेदोरे जेव्हा आपल्या महाराष्ट्राशी जोडले जातात, तेव्हा खरंच लाज वाटते. सीबीआय (CBI) तपासातून समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. लातूरचे मूळ रहिवासी असलेले आणि चक्क एनटीएच्या (NTA) पेपर सेटिंग पॅनेलमध्ये समाविष्ट असलेले प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात आपल्या राहत्या घरी विशेष कोचिंगच्या नावाखाली त्यांनी मूळ प्रश्नपत्रिका आणि उत्तरे कोट्यवधी रुपयांना विकली. पुण्यातून सुरू झालेलं हे रॅकेट नाशिक, अहिल्यानगर, जयपूर ते थेट हरियाणामधील गुरुग्रामपर्यंत पसरलं आहे. 15 ते 20 लाखांना एक-एक पेपर विकला गेला. म्हणजेच, ज्यांच्याकडे पैसा आहे ते डॉक्टर बनणार आणि जो प्रामाणिकपणे 650 गुण मिळवण्याची क्षमता ठेवतो, त्याने आत्महत्येचा मार्ग निवडायचा?
या शिक्षण माफियांच्या आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची हिम्मत नाहीये का या सरकारमध्ये? केवळ परीक्षा रद्द करून आणि नवीन तारीख देऊन विद्यार्थ्यांचा मनस्ताप कमी होत नसतो. या संपूर्ण रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांवर आणि दलालांवर अशी कठोर कारवाई झाली पाहिजे की, पुन्हा कोणाचेही विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचे धाडस होणार नाही. प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि त्यांच्या पालकांचा आक्रोश वाया जाणार नाही.
ज्या शिक्षण संस्थांनी आणि प्राध्यापकांनी या पवित्र क्षेत्राला कलंकित केलंय, त्यांच्या संपत्तीवर टांच आणली पाहिजे. हा लढा केवळ एका परीक्षेचा नाही, तर या देशातील गुणवत्तेचा आणि प्रामाणिकपणाचा आहे. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि या शिक्षण माफियांच्या मुसक्या आवळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, हा आमचा निर्धार आहे, असे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे.