Headlines

प्रतिभा समाजासाठी वरदान, कलावंतासाठी शाप:कौशल इनामदार यांचे ‘गझलविधा’ संमेलनात मत; 25 गझलकारांचे सादरीकरण




ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार यांनी ‘प्रतिभा समाजासाठी वरदान असली तरी कलावंतासाठी तो शाप असतो,’ असे स्पष्ट मत व्यक्त केले. ‘गझलविधा’ समूहातर्फे आयोजित एकदिवसीय ‘गझलविधा’ संमेलनात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. या संमेलनात २५ हून अधिक गझलकारांनी आपली कला सादर केली. पुण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन येथे रविवारी (दि. १७) हे संमेलन पार पडले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ गझलकार डॉ. कैलास गायकवाड, ‘गझलविधा’ समूहाचे निमंत्रक भूषण कटककर, शाम खामकर आणि डॉ. दिलीप पांढरपट्टे यावेळी मंचावर उपस्थित होते. इनामदार म्हणाले की, कवी शब्दांमधून शब्दांपलीकडचे सांगण्याचे कार्य करत असतात, त्यामुळे चांगला गझलकार होण्यासाठी चांगला कवी असणे आवश्यक आहे. कवी, गझलकार आणि लेखकाने आपण का लिहितो याचा परखडपणे विचार केल्यास तो कागदाला लेखणी लावताना दचकून जाऊ शकतो. आजच्या साहित्यिकांमध्ये हे दचकणे दिसत नाही, उलट सगळीकडे सादरीकरणाचे स्तोम माजलेले दिसते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. कविता व्यक्त होण्याची मुभा देते, त्याचबरोबर अव्यक्त होण्याची, लपविण्याची देखील मुभा देत असते, असेही इनामदार यांनी नमूद केले. फार कमी कलावंतांना प्रतिभा मिळते. दुःखी गाण्यांची आज आक्रोश गीते झालेली दिसतात. कलाकाराने जे अंतर्मुख होऊन अभ्यासायचे असते, तेच मोठ्या प्रमाणात बाहेर फेकले जात आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. यावेळी डॉ. कैलास गायकवाड यांनी, ‘आपण सर्वजण मनोव्यापारी आहोत. भाषा विकसित झाल्यानंतर कलेची निर्मिती झाली. कला हे व्यक्त होण्यासाठीचे मोठे साधन असून त्यात साहित्यनिर्मितीला वरचे स्थान आहे,’ असे सांगितले. डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी गझलकाराने सातत्याने वाचन करणे आणि दुसऱ्याला ऐकणे आवश्यक असल्याचे म्हटले. तसेच, स्वतःचे दुःख न मांडता जगाचे दुःखही मांडले पाहिजे, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शाम खामकर यांनी आयोजनाविषयी माहिती दिली, तर भूषण कटककर यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. प्राजक्ता पटवर्धन यांच्या ‘निव्वळ योगायोग’ या संग्रहाचा सन्मान कौशल इनामदार यांच्या हस्ते करण्यात आला. कौशल इनामदार यांचे स्वागत मानपत्र देऊन करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *