Headlines

अमरावतीत कोबार्क येथे कॅरिकॅचर, एआय कार्यशाळा:कला आणि तंत्रज्ञानाच्या संगमातून कलाप्रेमींना मिळाली नवीन कौशल्ये




अमरावती येथील कॉलेज ऑफ ॲनिमेशन बायो इंजीनियरिंग अँड रिसर्च सेंटर (कोबार्क) येथे १६ मे रोजी एक दिवसीय कॅरिकॅचर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला अमरावतीतील कलाप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कला आणि तंत्रज्ञानाचा अनोखा संगम साधणारी ही कार्यशाळा विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरली. ‘कार्टून आणि कॅरिकॅचर’ या विषयावर आधारित या कार्यशाळेत प्रख्यात कलाकार, ॲनिमेटर आणि कॅरिकॅचरिस्ट विजय राऊत यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी चेहऱ्याची रचना आणि प्रमाणबद्धता मोडून व्यक्तिमत्त्व कसे उठावदार करावे, तसेच डोळे, नाक, हनुवटी यांसारख्या अवयवांना गमतीशीर पद्धतीने मोठे किंवा वेगळे करून पात्र ठळक कसे करता येईल, याचे धडे दिले. या कार्यशाळेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ पारंपरिक रेखाटन शिकवले गेले नाही, तर आधुनिक काळातील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर कसा करावा, याचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. विजय राऊत यांनी वेगवेगळ्या पात्रांचे अवयव एकत्र करून विनोदी व्यक्तिरेखा कशी तयार करायची, डिजिटल रंग भरण्याचे तंत्र आणि आधुनिक एआय सॉफ्टवेअरचा वापर करून कॅरिकॅचरला गती व आवाज कसा द्यावा, यावर विशेष मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या शेवटी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कॅरिकॅचरचे एक छोटेखानी प्रदर्शनही भरवण्यात आले होते. कोबार्कच्या प्राचार्यांनी कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्था भविष्यातही अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना पूर्ण पाठिंबा देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. ही कार्यशाळा केवळ कौशल्य विकासापुरती मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणारी आणि ॲनिमेशनच्या क्षेत्रातील करिअरच्या नवीन दिशा दाखवणारी ठरली. कार्यशाळेत सहभागी झालेल्या कोबार्कच्या विद्यार्थी वेदांत नागपुरे याने सांगितले की, “विजय सरांच्या मार्गदर्शनामुळे कॅरिकॅचर कसे जिवंत करावे हे समजले. विशेषतः एआय टूल्स वापरून गती देण्याचा भाग आमच्या आगामी प्रोजेक्ट्ससाठी खूप फायदेशीर ठरेल.” सकाळपासूनच कोबार्कचे प्रांगण एका वेगळ्याच उत्साहाने भारून गेले होते. हातामध्ये पेन्सिल, ब्रश आणि आधुनिक डिजिटल टॅब्लेट घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सेलिब्रिटी, राजकीय नेते ते सामान्य माणसांच्या चेहऱ्यांवरील भाव कॅरिकॅचरच्या माध्यमातून कागदावर आणि स्क्रीनवर उतरवले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *