![]()
तिवसा येथे महावितरण कर्मचाऱ्यांनी वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करूनही बोनस न मिळाल्याने तीव्र आंदोलन केले. ‘महाराष्ट्र राज्य कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समिती’च्या वतीने तिवसा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून आणि जोरदार घोषणाबाजी करत हा निषेध नोंदवण्यात आला. महावितरण प्रशासनाने कर्मचाऱ्यांना दिवाळी ते मार्च अखेरपर्यंतची वीज बिल थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केल्यास बोनस देण्याचे आश्वासन दिले होते. कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून हे उद्दिष्ट पूर्ण केले. मात्र, उद्दिष्ट पूर्ण होऊन एक महिना उलटला तरी प्रशासनाने बोनस (सानुग्रह अनुदान) अदा केले नाही, ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. प्रशासनाच्या या विश्वासघातामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. या आंदोलनात केवळ बोनसचाच मुद्दा गाजला नाही, तर कर्मचाऱ्यांच्या इतर ज्वलंत मागण्यांवरही आवाज उठवण्यात आला. वीज कामगारांना बोनस/सानुग्रह अनुदान तात्काळ मंजूर करावे, सर्व वीज अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सिमकार्ड संदर्भात प्रशासनाकडून सुरू असलेली जाचक कार्यवाही तात्काळ थांबवावी आणि वीज कर्मचारी, अभियंते व अधिकाऱ्यांवरील प्रशासनाचे दबाव तंत्र बंद व्हावे, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात कृती समितीतील सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वाभिमानी वीज कामगार संघटना, तिवसा येथील वीज कर्मचारी अभिजित केचे यांनी सांगितले की, प्रशासनाने दिलेला शब्द पाळला नाही, म्हणूनच आज संपूर्ण राज्यभरात सर्व संघटना एकत्र येऊन तीव्र निषेध नोंदवत आहेत.
Source link
वीज बिल वसुली करूनही कर्मचाऱ्यांना बोनस मिळेना:तिवस्यात 'कृती समिती' आक्रमक, काळ्या फिती लावून निषेध