Headlines

शिवसेनेच्या बैठकीला बड्या नेत्याची दांडी:माजी खासदार देणार एकनाथ शिंदेंना धक्का; हेमंत गोडसे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष्य




सत्ताधारी शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नाशिक येथील बैठकीला माजी खासदार हेमंत गोडसे यांनी दांडी मारली आहे. यामुळे हेमंत गोडसे वेगळी वाट निवडणार काय? अशी चर्चा शिवसेनेच्या गोटात सुरू झाली आहे. त्यांनी खरेच अशी भूमिका घेतली तर ती एकनाथ शिंदे यांच्यासाठी एक मोठा धक्का असेल. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून राज्यभर पक्षबांधणी आणि संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांच्या बैठका घेत आहेत. मात्र नाशिकमधील बैठकीत हेमंत गोडसे यांची गैरहजेरी विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. सोमवारी नाशिकमध्ये झालेल्या या बैठकीला उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे यांच्यासह पक्षाचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती आखणे, संघटनात्मक बदलांवर चर्चा करणे आणि कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. त्यामुळे पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती अपेक्षित होती. मात्र, माजी खासदार हेमंत गोडसे यांनी या बैठकीला दांडी मारल्याने शिवसेनेच्या गोटात नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून ते पक्षाच्या विविध कार्यक्रमांपासून दूर राहत असल्याचे चित्र दिसत आहे. नुकतीच नाशिकच्या संपर्कमंत्रीपदी उदय सामंत यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या बैठकीलाही हेमंत गोडसे अनुपस्थित राहिले होते. याशिवाय काही अन्य संघटनात्मक बैठकींनाही त्यांनी हजेरी लावली नव्हती. पक्षाच्या नव्या कार्यकारिणीत त्यांना अपेक्षित स्थान न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचा प्रभाव वाढवण्यात हेमंत गोडसे यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे त्यांची नाराजी पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकते, असे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, शहरात असूनही त्यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने त्यांच्या भूमिकेबाबत अधिकच तर्कवितर्क लावले जात आहेत. शिवसेनेतच राहणार की वेगळी वाट निवडणार? दरम्यान, हेमंत गोडसे भविष्यात कोणता राजकीय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ते पक्षातच राहून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार की वेगळी राजकीय वाट निवडणार, याबाबत सध्या चर्चा रंगल्या आहेत. जर त्यांनी वेगळी भूमिका घेतली, तर तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जाऊ शकतो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर नाशिकमधील ही घडामोड शिवसेनेसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *