![]()
बाळे (तोडकर वस्ती) भागात एका निवासी घराच्या आवारात दुर्मिळ प्रजातीचा ‘ल्युसिस्टिक’ नाग आढळून आला आहे. शनिवारी, १६ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास स्थानिक रहिवाशांना आपल्या वॉल कंपाऊंडजवळ एक साप दिसला. त्यांनी तात्काळ वन्यजीव संस्थेला याची माहिती दिली. संस्थेच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, सुमारे पावणेपाच फूट लांबीचा हा विषारी नाग असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, नेहमीच्या नागांपेक्षा वेगळेपण म्हणजे या सापाच्या डोक्यावर आणि मानेभोवती पांढऱ्या रंगाचे ठिपके होते. हा साप कोणत्याही प्रकारे जखमी नव्हता. हा सामान्य नाग नसून अनुवांशिक बदलामुळे त्वचेवर पांढरे डाग असलेला अत्यंत दुर्मिळ ‘ल्युसिस्टिक’ प्रकारचा नाग असल्याचे सर्पमित्रांच्या निदर्शनास आले. प्राण्यांच्या डॉक्टरांद्वारे या नागाची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सापाला कोणत्याही प्रकारचा संसर्ग किंवा बुरशीजन्य आजार नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यानंतर वनविभागाकडे या दुर्मिळ सापाची रीतसर नोंद करण्यात आली. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, उपवनसंरक्षक आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या नागाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडून देण्यात आले. या बचाव कार्यात सोलापूर वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि वन्यजीव संस्थेचे सदस्य उपस्थित होते. काय आहे ही स्थिती? ‘ल्युसिझम’ ही प्राण्यांमधील एक अनुवांशिक स्थिती आहे, ज्यामध्ये रंगद्रव्य तयार करणाऱ्या पेशींच्या कमतरतेमुळे त्वचेचा मूळ रंग जाऊन त्यावर पांढरे डाग पडतात. या स्थितीत प्राण्यांच्या केवळ बाह्य त्वचेवर परिणाम होतो, मात्र त्यांचे डोळे सामान्य रंगाचेच राहतात. नैसर्गिक रंग नसल्यामुळे असे प्राणी शत्रूंना सहज दिसून येतात आणि निसर्गात टिकून राहणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक असते.
Source link
सोलापूरमध्ये आढळला अत्यंत दुर्मिळ 'ल्युसिस्टिक' नाग:डोक्यावर आहेत पांढरे ठिपके; वन्यजीव संस्थेकडून सुरक्षित रेस्क्यू