![]()
छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अडथळा आणल्याच्या निषेधार्थ किसान काँग्रेसने आज (दि. १८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले. मका आणि कापूस खरेदी सुरू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. किसान काँग्रेसने पालकमंत्र्यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मांडत असताना त्यांना बोलण्यापासून रोखल्याने शेतकरी संघटनांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर किसान काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात किसान काँग्रेसने शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांवर टीका केली. शासनाने मक्यासाठी प्रति क्विंटल २५०० रुपये हमीभाव जाहीर केला असला तरी, प्रत्यक्षात खरेदी केंद्रे सुरू नसल्याने व्यापारी केवळ १२५० रुपये प्रति क्विंटल दराने मका खरेदी करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, ग्रामीण भागातील शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. कांदा, कापूस आणि सोयाबीनचे भाव कोसळल्याने शेतकरी आधीच संकटात आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश सचिव अनिस पटेल, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रमंडवाल आणि अल्पसंख्याक काँग्रेसचे शहराध्यक्ष मोईन इनामदार यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून शेतकऱ्यांचा शेतीमाल हमीभावाने खरेदी करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास किसान काँग्रेस संपूर्ण महाराष्ट्रात सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अशोक डोळस, मनपाचे माजी सभापती ॲड. इक्बालसिंग गिल, अकिप राजवी, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष शेजवळ, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष अभिषेक शिंदे, मानवाधिकार विभागाचे अध्यक्ष शेख कैसर बाबा, काँग्रेस परिवहन विभागाचे अध्यक्ष असमत खान, महिला काँग्रेस नेत्या अनिताताई भंडारी, माजी जिल्हाध्यक्ष हेमाताई पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
किसान काँग्रेसचे पालकमंत्री शिरसाट यांच्या विरोधात आंदोलन:मका, कापूस खरेदीच्या प्रश्नांवर अडथळा आणल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने