![]()
पीएमएलए कोर्टाने आज भोंदू अशोक खरातची 6 दिवसांच्या ईडी कोठडीत रवानगी केली. यावेळी झालेल्या सुनावणीत ईडीच्या वकिलांनी अशोक खरातने पतसंस्थांमधील बोगस खात्यांचा वापर पैशांचे लेअरिंग करण्यासाठी केल्याचा आरोप केला. यावेळी खरातने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण अखेर कोर्टाने त्याला ईडीच्या कोठडीत पाठवले. भोंदू अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. याशिवाय आर्थिक फसवणुकीचेही अनेक आरोप त्याच्यावर आहेत. ईडीने त्याचा ताबा घेतल्यानंतर आज त्याला मुंबई स्थित पीएमएलए कोर्टातपुढे हजर करण्यात आले. यावेळी झालेल्या सुनावणीत ईडीच्या वकिलांनी काही महत्त्वाच्या गोष्टी कोर्टापुढे मांडल्या. ईडीच्या युक्तिवादानुसार, अशोक खरातने समता नागरी क्रेडिट सोसायटीत अनेकांच्या नावाने 63 खाती उघडली. या सर्व खात्यांना खरातचा नंबर जोडण्यात आला. तसेच या खात्यांचा नॉमिनी म्हणूनही खरातचेच नाव होते. त्याचा लाभार्थीही तोच होता. या खात्यांचा वापर पैशांचे लेअरिंग करण्यासाठी करण्यात आला. या खात्यांत कोट्यवधींची रक्कम रोकडीत भरण्यात आली आणि काढण्यात आली. एवढे पैसे कुठून आले व कुठे गेले? आम्हाला या प्रकरणी अंतिम लाभार्थ्यापर्यंत पोहोचायचे आहे. या प्रकरणात इतर कुणाचा हात आहे का? याचा शोध घ्यायचा आहे. प्रस्तुत प्कररणात कोणतीही डिपॉझिट स्लिप न भरता कॅशियरच्या मदतीने थेट खात्यात पैसे जमा करण्यात आले. अशोक खरातच प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात हा एका संस्थेचा अध्यक्ष होता. त्याची 34 बेनामी एफडी खाती उघडण्यात आली. या सर्व खात्यांत रोख रकमेच्या स्वरुपातच पैसे काढण्यात आले. 2014 ते 2024 पर्यंत हा प्रकार सुरू होता. एफडीचे पैसे खरातकडेच सोपवण्यात आल्याने तोच मुख्य आरोपी आहे. याशिवाय खरातच्या पत्नीच्या खात्यात व तिच्या नावानेही मोठी रक्कम व मालमत्ता देण्यात आली आहे. या 5 कोटींशिवाय 2 कोटींहून अधिकची रक्कम बँक खात्यांत आहे. या प्रकरणी बँकांकडे चौकशी करण्याची गरज आहे. या प्रकरणातील व्यापक लोकहीत लक्षात घेता त्याच्या 10 दिवसांच्या कोठडीची गरज आहे, असे ईडीच्या वकिलांनी म्हटले. केवळ व्याजासाठी पैसे बँकेत ठेवले – खरात दुसरीकडे, अशोक खरातच्या वकिलांनी यावेळी ईडीचे आरोप फेटाळत हा काही शेड्युल्ड गुन्हा नसल्याचा दावा केला. तसेच खरातच्या ईडी कोठडीलाही विरोध दर्शवला. यावेळी खरातने स्वतः आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. बँकेच्या चेअरमन व मॅनेजरने खात्यात काही पैसे आल्याचे मला सांगितले. आवारेंनी बँकेत पेसे ठेवले तर 9 टक्के व्याज मिळेल असे सांगितले होते. याशिवाय मला काहीही माहिती नाही. आवारे व मॅनेजर हे दोघेही सध्या तुरुंगात आहेत. मला काही माहिती नाही. फक्त व्याज चांगले मिळते म्हणून मी तिथे पैसे ठेवले, असे तो म्हणाला. अखेर कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर खरातला 6 दिवसांची ईडी कोठडी ठोठावली.
Source link