![]()
मतदार यादीतून नावे वगळण्याच्या प्रक्रियेबाबत (एसआयआर) देशभरात निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर माहिती देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्यासोबतची चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगत, महाराष्ट्रातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील निवडणुकांमध्ये या प्रक्रियेचा भाजपला फायदा झाल्याचा संदर्भ देत, महाराष्ट्रात अशी पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी नागरिक म्हणून सर्वांनीच सतर्क राहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, आपल्या सर्वांना हे माहीत आहे की आज महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाची भेट घेतली. देशभरात जा जो एक प्रश्न गाजला आहे की एसआयआर, मतदारांना मतदार यादीतून वगळण्याचे काम सुरू आहे. त्यावर आमच्या अनेक शंका आणि सूचना होत्या ते सर्व घेऊन आम्ही आज निवडणूक आयोगासोबत आणि निवडणूक आयोगाचे सीइओ चोकलिंगम साहेबांसोबत सखोल चर्चा केली. सकारात्मक चर्चा झाली आणि अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. या चर्चेतून जे काही आम्ही सूचना केल्या आहेत त्याची अंमलबजावणी होईल असे आत्ता तरी आम्हाला वाटत आहे. तरी देखील आम्ही यावर काम करत आहोत. ज्या नागरिकांना भीती वाटत असेल किंवा शंका असतील त्यांना यांच्या पक्षाकडून मदत करायचे काम करत आहोत. पश्चिम बंगालची निवडणूक एसआयआरमुळेच भाजपने जिंकली पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात निवडणुका लोकसभेची असो किंवा विधानसभेची असो, ही ‘एसआयआर’ची जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती सुरळीत व्हावी, नीट व्हावी, कोणालाही वगळण्यात येऊ नये. जी रीतसर यादी आहे, नागरिक आहेत, मतदार आहेत त्यांचे नाव वगळण्यात येऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. याबाबत आम्ही चर्चा केली आहे. आपण पाहिले असेल की बिहारमध्ये जे काही झाले किंवा बंगालमध्ये जे काही झाले, असे म्हटले जाते की पश्चिम बंगालची निवडणूक ही एसआयआरच्याच प्रक्रियेमुळे भाजपने जिंकलेली आहे. त्यात जवळपास 90 टक्के योगदान आहे एसआयआरचे. हे जरी खरे असले तरी महाराष्ट्रात आणि इतर राज्यात जिथे एसआयआर सुरू होईल आता ते होऊ नये यासाठी आपल्या सर्वांची नागरिक म्हणून जबाबदारी आहे. निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप असू नये- शशिकांत शिंदे आदित्य ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे म्हणाले, निवडणुका या निष्पक्षपणे व्हाव्या. कोणाच्या तरी प्रक्रियेत हस्तक्षेपामुळे असे होऊ नये असे आम्हाला वाटते. राजकीय हस्तक्षेप असू नये असे आम्हाला वाटते. निवडणूक प्रक्रियेत नावाचे व्हेरीफिकेशन होईल तेव्हा ते करत असताना जी नावे कमी होणार आहेत त्याची यादी बीएलओला दिली पाहिजे, अशा सूचना आम्ही निवडणूक आयोगाला केल्या आहेत. तसेच त्यांनी या काही सूचना मान्य देखील केल्या आहेत. आत्ता तरी सकारात्मक भूमिका निवडणूक आयोगाची आम्हाला पाहायला मिळाली आहे. स्थलांतरितांच्या प्रश्नी निवडणूक आयोगाकडे उत्तरच नाही- सचिन सावंत पुढे बोलताना कॉंग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले, यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 38 मुद्यांमधल्या काही मुद्यांवर निवडणूक आयोगाकडे अजूनही स्पष्टीकरण नाही. त्यासाठी चोकलिंगम साहेबांनी सांगितले की केंद्रीय निवडणूक आयोगाचे काही निर्देश घ्यायचे आहेत. तसेच आम्हाला कदाचित केंद्रीय निवडणूक आयोगाची देखील भेट घ्यावी लागणार आहे. तर मुंबईसाठी महत्त्वाचा मुद्दा हा होता की ज्याच्या संदर्भात चर्चा झाली, ते म्हणजे जे स्थलांतरित आहेत, तिथे मोठ्या प्रमाणात पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. तर त्या स्थलांतरितांसाठी काय केले जाणार? त्यामुळे एसआयआर प्रक्रियेला सामोरे जाण्याआधी इथल्या प्रश्नावर काय तोडगा काढला जाणार, तर यावर आयोगाकडे स्पष्टीकरण नाही.
Source link
एसआयआरच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आक्रमक:निवडणूक आयोगाची घेतली भेट; कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळू नये, आदित्य ठाकरेंची मागणी