Headlines

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने 71 लाखांची फसवणूक:सायबर चोरट्यांनी कोथरूडमधील व्यक्तीला लुटले




शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी कोथरूड येथील एका व्यक्तीची ७१ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात अनोळखी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड भागात राहणाऱ्या ५३ वर्षीय तक्रारदाराला डिसेंबर २०२४ मध्ये सायबर चोरट्यांकडून त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश आला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्यांना दाखवण्यात आले. त्यानंतर तक्रारदाराला समाज माध्यमातील एका समूहात सहभागी करून घेण्यात आले. सायबर चोरट्यांनी त्यांना विविध गुंतवणूक योजनांची माहिती दिली. या आमिषाला बळी पडून तक्रारदाराने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी ७१ लाख २० हजार रुपये जमा केले. चोरट्यांनी त्यांना परतावा मिळाल्याचे भासविले, मात्र प्रत्यक्षात कोणताही परतावा दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. नोकरीच्या आमिषाने गंडा दरम्यान, नोकरीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका तरुणीची आठ लाख ९१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा दुसरा प्रकारही उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा भागात राहणाऱ्या या तरुणीला चोरट्यांनी तिच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठवून खासगी कंपनीत नोकरीची संधी असल्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तरुणीला पैसे जमा करण्यास सांगितले. एका आठवड्यात तरुणीने चोरट्यांच्या खात्यात आठ लाख ९१ हजार रुपये जमा केले. चोरट्यांनी तिला आठवड्याभरात नियुक्तीपत्र देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, जेव्हा तरुणीने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांचे मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नवनाथ शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *