![]()
मॅडम मेनका कोरिओग्राफी मूव्हमेंट हा उपक्रम २३ आणि २४ मे रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. पारंपरिक म्हणी व वाक्प्रचारांच्या माध्यमातून समकालीन वास्तवावर आधारित सर्जनशील नृत्याविष्कार सादर करण्याची संधी या उपक्रमातून दिली जाईल. ज्येष्ठ कथक नृत्यांगना विदुषी शमा भाटे, नादरूप संस्था आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या वतीने सायंकाळी ५.३० वाजता ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग, टिळक रस्ता येथे हा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती हे या उपक्रमाचे विशेष आकर्षण आहे. विदुषी शमा भाटे यांनी माहिती दिली की, मॅडम मेनका यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन या उपक्रमाची पायाभरणी झाली आहे. उभरत्या तसेच प्रस्थापित नृत्यकलाकारांनी कालातीत शहाणपण सूचित करणाऱ्या आणि समाजजीवनात रुजलेल्या म्हणींवर आधारित नृत्यसंरचना सादर करणे, हे या उपक्रमाचे वेगळेपण आहे. नृत्यशैलींमध्ये प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या पौराणिक कथा किंवा दैवतशास्त्राऐवजी, कलाकारांनी स्वतःची नाविन्यपूर्ण आणि आशयसंपन्न नृत्यप्रस्तुती करावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे. यावर्षी मॅडम मेनका कोरिओग्राफी मूव्हमेंटमध्ये मोमिता घोष, दीपिका पोतदार, अवनी गद्रे, हनी उन्नीकृष्णन आणि मनीषा गुल्यानी हे नृत्यकलाकार विविध पारंपरिक म्हणींवर आधारित नृत्यसंरचना सादर करतील. या कलाकारांच्या नृत्यप्रस्तुतीचे कलात्मक परीक्षण करण्यासाठी आलोक पराडकर, डॉ. नितीन हडप, डॉ. चैतन्य कुंटे, प्रदीप वैद्य, अरुंधती पटवर्धन आणि विभावरी देशपांडे यांसारख्या मान्यवर कलाकारांचे आस्वादक मंडळ उपस्थित असेल. प्रत्येक प्रस्तुतीनंतर हे मंडळ नृत्यसंरचनेविषयी आणि सर्जनशीलतेविषयी मुक्त संवाद साधेल. यामुळे रसिकांनाही कला, कलाभिव्यक्ती आणि समकालीन वास्तवाशी नाते जोडण्याची संधी मिळेल. कलाप्रस्तुतीच्या प्रक्रियेत संरचनेचे स्थान, नवकल्पनांचा शोध, परंपरेची समकालीन मांडणी आणि यातून कलाकार व रसिकांचे होणारे उन्नयन, असा प्रवास या उपक्रमातून अपेक्षित आहे, असे शमा भाटे यांनी सांगितले.
Source link
मॅडम मेनका कोरिओग्राफी मूव्हमेंट 23-24 मे रोजी:पुण्यात पारंपरिक म्हणींवर आधारित सर्जनशील नृत्याविष्कार