Headlines

पुणे मनपा अधिकारी आठवड्यातून एकदा सार्वजनिक वाहन वापरणार:इंधन बचतीसाठी युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय




आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी पुणे महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एकदा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता, अधिकाऱ्यांच्या वाहन वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. जागतिक इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होत असल्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, प्रकल्प पाहणीसाठी जाताना अधिकाऱ्यांनी एकाच वाहनातून प्रवास करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, पालिकेच्या ताफ्यातील ई-वाहनांचा अधिकाधिक वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. शक्य असलेल्या बैठका ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी काटकसरिने वाहनांचा वापर केल्यास इंधन बचत देखील होईल असे सांगण्यात आले आहे. आखातातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर इंधनाचा केवळ आवश्यक तेथेच वापर करावा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले होते. त्यांच्या या भूमिकेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच इतर राज्यांतील मंत्र्यांनीही इंधन बचतीसाठी पुढाकार घेतला आहे. राज्य शासनाच्या सूचनांनुसार पुणे महापालिकेनेही या उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. अतिरिक्त आयुक्त नायर यांनी व्हेईकल डेपोचे उपायुक्त संदीप कदम यांच्यासोबत बैठक घेऊन संबंधित निर्देश दिले. दरम्यान, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल यांसारख्या अत्यावश्यक सेवांसाठीच्या वाहनांमध्ये कोणतीही कपात केली जाणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *