Headlines

पैठण, सिल्लोड, कन्नडला इंधनाचा तुटवडा:डिझेलसाठी शेतकऱ्यांची धावपळ, पंपावर सकाळपासूनच गर्दी, अनेक ठिकाणी ‘नो पेट्रोल’चे फलक‎




जिल्ह्यातील पैठण, सिल्लोड, लासूर स्टेशन, नाचनवेल, कन्नड परिसरातील पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून, पेट्रोल-डिझेलसाठी वाहनधारकांच्या पंपावर लांबच लांब रांगा लागत आहे. दरम्यान, सध्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेती मशागतीची कामे सुरू आहेत. मात्र, ट्रॅक्टरसाठी इंधनच मिळत नसल्याने शेतकऱ्यांना धावपळ करावी लागत असल्याचे चित्र आहे. पैठणला गेल्या दोन दिवसांपासून इंधनटंचाईमुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत. ग्रामीण भागातील बहुतांश पंपांवर ‘नो पेट्रोल’ आणि ‘नो डिझेल’चे फलक कायम असल्याने शेतकरी, प्रवासी तसेच मालवाहतूकदार अडचणीत सापडले आहेत. शेतीची कामे, बाजारपेठेतील वाहतूक तसेच दैनंदिन प्रवासावरही त्याचा परिणाम होत आहे. शहरातील काही पेट्रोल पंपांवर बुधवारी सकाळपासून टँकरद्वारे इंधन पोहोचण्यास सुरुवात झाली. मात्र पुरवठा सुरू होताच वाहनधारकांनी एकच गर्दी केल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. दुचाकी, चारचाकी आणि मालवाहू वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. दरम्यान, इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन आणि तेल कंपन्यांकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रामीण भागातही लवकरच पुरवठा पूर्ववत होईल असे तहसीलदार ज्योती पवार यांनी सांगितले. सिल्लोड तालुक्यात ३६ पेट्रोल पंप असून, याठिकाणीही वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तालुक्यात मंगळवारपासून तुटवड्याचे प्रमाण वाढले असल्याने जनता त्रस्त झाली आहे. सध्या सर्वत्र शेती मशागतीची काम सुरू असल्याने शेतकऱ्यांना नांगरणीसाठी आपल्या ट्रॅक्टरमध्ये डिझेलची गरज भासत आहे. शेती मशागतीच्या वेळी डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमधून संताप आहे. डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना अधिक अडचणी निर्माण होऊ शकतील याबाबत तत्काळ दखल घेण्याची मागणी आहे. नाचनवेल परिसरात शेती कामांवर झाला परिणाम नाचनवेल व चिंचोली लिंबाजी परिसरात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे शेतकरी, ट्रॅक्टर मालक तसेच वाहनधारक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर मशागत, नांगरणी, वखरणी यांसारखी महत्त्वाची कामे सुरू होण्याची वेळ आली असताना ट्रॅक्टरसाठी डिझेल उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पेट्रोल मिळत नसल्यामुळे वाहनधारक देखील त्रस्त आहेत. अनेकांना एका पंपावरून दुसऱ्या पंपावर भटकंती करावी लागत आहे. लासूर स्टेशन येथील पाचही पंपावर तुटवडा; शेतातील मशागतीची कामे रखडली गेल्या आठ-दहा दिवसांपासून ग्रामीण भागात डिझेल टंचाई तीव्र झाल्याने चारचाकी वाहनधारकांसह शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्याने खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली पेरणीपूर्व मशागतीची कामे रखडली आहेत. लासुर स्टेशन येथील पाचही पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा जाणवत असून काही मोजक्याच पंपांवर एक दोन दिवसाआड इंधन उपलब्ध होत आहे. बारा किंवा अठरा हजार लिटर प्रमाणे टँकर येताच इंधन भरण्यासाठी गर्दी वाढत आहे. अनेक वेळा वाहनधारकांचा क्रमांक येण्यापूर्वीच डिझेलचा साठा संपत असल्याने नागरिक मोठमोठे कॅन घेऊन पंपावर नंबर लावताना दिसत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *