![]()
आयकर भवन, अहिल्यानगरच्या वतीने बुरुडगाव रोडवरील सीए भवन येथे “नवीन इनकम टॅक्स ॲक्ट २०२५’ या विषयावर विशेष जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चार्टर्ड अकाउंटंट, करसल्लागार, व्यापारी, बँक अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे रेंज-१ चे कमिश्नर ऑफ इन्कम टॅक्स डॉ. उमेश फडे उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, नवीन आयकर अधिनियम २०२५ हा १ एप्रिल २०२६ पासून देशभरात लागू झाला आहे. हा नवीन कायदा करप्रणाली अधिक सुलभ, स्पष्ट आणि करदात्यांसाठी सोयीस्कर करणारा आहे. हा अधिनियम म्हणजे करप्रणाली साधी आणि सुटसुटीत करण्याचा प्रयत्न असून, यामध्ये नियम बदल न करता तेच ठेवणे (सातत्य) आणि नियम स्पष्ट ठेवणे (निश्चितता) या मूलभूत गोष्टींवर भर देण्यात आला आहे. करदात्यांसाठी ही पद्धत अतिशय सोपी आणि विश्वासार्ह ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी आयकर अधिकारी प्रकाश हजारे आणि गौरव कुमार यांनी नवीन कायद्याच्या विविध तांत्रिक तरतुदी, रिटर्न प्रक्रिया आणि कायदेशीर बाबींवर उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. सीए असोसिएशनचे अभय कटारिया आणि सीए प्रसाद भांडारी यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले. भांडारी यांनी नवीन कायद्याच्या व्यावहारिक अंमलबजावणीविषयी व्यापारी व व्यावसायिक वर्गाला उपयुक्त टिप्स दिल्या. या अभियानाला अडते बाजार समितीचे पदाधिकारी, विविध शुगर फॅक्टरींचे प्रतिनिधी तसेच बँक कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. या उपक्रमामुळे नवीन कर रचनेबाबत करदात्यांमध्ये असलेली भीती दूर होऊन मोठी स्पष्टता मिळाल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. डॉ. उमेश फडे करदात्यांसाठी महत्त्वाच्या गोष्टींवर दिली माहिती अंमलबजावणी : नवीन आयकर कायदा १ एप्रिल २०२६ पासून पूर्णपणे लागू झाला आहे. मूलभूत उद्दिष्ट : करप्रणालीचे सुलभीकरण करणे आणि क्लिष्टता कमी करणे. फायदा : रिटर्न भरण्याची प्रक्रिया अधिक सोपी होणार असून, करदात्यांच्या मनात कर रचनेविषयी निश्चितता राहील. व्यापारी व उद्योग क्षेत्र : नवीन नियमांमुळे व्यावसायिक आणि उद्योगांना कर अनुपालन करणे अधिक सुटसुटीत होणार आहे.
Source link
नव्या आयकर कायद्यामुळे करप्रणाली अधिक सुलभ:अहिल्यानगरमध्ये ‘नवीन इनकम टॅक्स ॲक्ट 2025’ वर कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद