Headlines

"टेक फेस्ट'मध्ये विद्यार्थ्यांकडून कोडिंग, वक्तृत्व व सर्जनशीलतेचे उत्कृष्ट प्रदर्शन:डॉ. विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात महोत्सव उत्साहात‎




विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत आयोजित ‘टेक फेस्ट २०२६’ हा दोन दिवसीय तांत्रिक महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने आयोजित या महोत्सवाची थीम “अवेकिंग द इंटेलिजन्स विदिन द मशीन’ अशी होती. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी कोडिंग, सादरीकरण, वक्तृत्व व सर्जनशीलतेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. या महोत्सवात विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कृत्रिम बुद्धिमत्ता व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या कौशल्यांचे प्रदर्शन करण्याची उत्तम संधी मिळाली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून व्ही.आर.डी.ई.चे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ आर. पी. वायकर उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे सांगत त्यांनी आपल्या भाषणातून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. दीपक विधाते, शिक्षक समन्वयक डॉ. प्रतिभा गायके, प्रा. प्राजक्ता डोलारे, प्रा. गणेश डहाणे, प्रा. आरती बावणे, प्रा. अविनाश पुंड, प्रा. काजल दवंगे, प्रा. अश्विनी देशमुख, प्रा. पूजा वैकर, तसेच विद्यार्थी समन्वयक सुरज हुंडाडे, ओंकार जोशी, पूजा केवट आदींचे मोलाचे योगदान लाभले. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे डायरेक्टर टेक्निकल प्रा. सुनील कल्हापुरे, प्राचार्य डॉ. रवींद्र नवथर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या यशस्वी उपक्रमाबद्दल संस्थेचे डायरेक्टर जनरल (प्रशासन) डॉ. पी. एम. गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील, तसेच संस्थेचे चेअरमन व राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कौतुक केले. ‘टेक फेस्ट २०२६’ हा तांत्रिक क्षेत्रात नवचैतन्य निर्माण करणारा ठरला, अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. जपानी भाषा, संस्कृतीवर आधारित प्रोजेक्ट्स सादर महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेले जपानी भाषा आणि संस्कृतीवरील प्रोजेक्ट्स होते. जागतिक स्तरावर आयटी क्षेत्रात जपानमध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांनी जपानी भाषेतील कोडिंग, संस्कृतीचे तांत्रिक सादरीकरण आणि जपानी प्रोजेक्ट्सवर आधारित विशेष प्रश्नमंजुषा सादर केली. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून भाषा शिक्षणाचे सोपे मॉडेल्स यात मांडले होते, ज्याचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *