Headlines

पेट्रोलपंप चालकांचे फर्मान – 7/12 दाखवा डिझेल घ्या:परभणीतील प्रकार, शेतकऱ्यांचा संताप अनावर; कृषिमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश




सध्या महाराष्ट्रात खरीप हंगामाच्या मशागतीची कामे सुरू आहेत. ही कामे अंतिम टप्प्यात आली असताना परभणी शहर व जिल्ह्यात डिझेलची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे अनेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक झळकलेत. त्यातच काही पंप मालकांनी ‘सातबारा दाखवा आणि डिझेल घ्या’, असे कथित फर्मान सोडल्यामुळे शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधत चौकशीचे आदेश दिलेत. मध्यपूर्वेत अमेरिका व इस्त्रायलने इराण विरोधात मोर्चेबांधणी केली आहे. सध्या या भागात तणावपूर्ण शांतता आहे. पण होर्मुझची सामुद्रधुणी बंद असल्यामुळे येथून होणारी इंधनाची वाहतूक ठप्प पडली आहे. परिणामी, पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे भारतात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर इंधनासाठी लोकांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी हाणामारीचेही प्रकार घडलेत. या प्रकरणी विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली असताना परभणीतील पंपचालकांनी डिझेलसाठी सातबाऱ्याची मागणी केल्याची बाब समोर आली आहे. अगोदरच रात्रभर रांगेत उभे राहूनही डिझेल मिळत नाही. त्यातच आता पेट्रोल पंपचालकांनी सातबारा दाखवण्याची अट घालून शेतकऱ्यांची अडवणूक सुरू केली आहे. परिणामी, शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत. सरकारने ही अन्यायकारक अट रद्द करत पेट्रोलपंप चालकांना योग्य ते निर्देश देण्याची मागणी केली आहे. खरीप हंगाम धोक्यात येईल – अजित नवले अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉक्टर अजित नवले यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना डिझेलसाठी अशा अटींचा सामना करावा लागणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. यामुळे शेतीच्या मशागतीची कामे रखडून संपूर्ण खरीप हंगाम धोक्यात येईल. सरकारने या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून खते, बियाणे व इंधन प्राधान्यक्रमाने उपलब्ध करून द्यावे. या प्रकरणी सरकारने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तातडीने हस्तक्षेप करत पेट्रोलपंप चालकांना ताकीद द्यावी, असे ते म्हणाले. कृषिमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश दुसरीकडे, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी डिझेलसाठी सातबाराची मागणी केली जात असल्याचे वृत्त फेटाळले आहे. तसेच या प्रकाराच्या चौकशीचेही आदेश दिलेत. डिझेलसाठी सातारा मागणे निश्चितच चुकीचे आहे. माझे यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे झाले. त्यांना चौकशीचे आदेश दिलेत. राज्यात कुठेही इंधन टंचाई नाही. केवळ अफवांमुळे लोक घाबरून गर्दी करत आहेत. सध्या इंधनाचा खप 20 टक्क्यांनी वाढला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः राज्यात पेट्रोल – डिझेलचा पुरेसा साठा असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, सरकारच्या या स्पष्टीकरणानंतरही परभणीतील पेट्रोल पंपांवरील रांगा कमी झाल्या नाहीत. रोहित पवारांनी पोस्ट केला गर्दीचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी पेट्रोल पंपांवरील गर्दीचा व्हिडिओ पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, या सरकारने राज्यातील शेतकऱ्याला तडफडून मारायचं ठरवलंय की काय, अशी शंका येते. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आक्रोश करतोय पण सरकारला तिकडं लक्ष द्यायला वेळ नाही. आधीच दुष्काळाचं सावट आहे आणि त्याला कसं तोंड देणार असा प्रश्न असतानाच आता खरीपाच्या तयारीसाठी ट्रॅक्टरला डिझेलही मिळत नाही. पेट्रोल पंपावर शेकडोच्या रांगा लागल्या असून टँकर आल्यावर तर डिझेलसाठी चेंगराचेंगरी होतेय. शेतकऱ्याला काय झुरळासारखं चेंगरून मारण्याचा तर हा डाव नाही ना? हेच का अच्छे दिन?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *