![]()
देशभर गाजत असलेल्या नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून, या प्रकरणातील एका नव्या मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे. भौतिकशास्त्राचे प्रश्न लीक केल्याप्रकरणी मनीषा संजय हवालदार या महिलेला बेड्या ठोकण्यात आल्या असून, या महत्त्वपूर्ण कारवाईमुळे पेपरफुटीच्या या मोठ्या रॅकेटचे आणखी काही धागेदोरे उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यातील सेठ हिरालाल सर्फ प्रशालेत कार्यरत असलेल्या मनीषा हवालदार हिला सीबीआयने नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून अटक केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने तिची पेपर प्रक्रियेसाठी तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती, ज्यामुळे तिला भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकांपर्यंत सहज पोहोचता येत होते. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या मनीषा मांढरे हिच्या संगनमताने तिने भौतिकशास्त्राचे काही प्रश्न लीक केले होते आणि तपासादरम्यान हेच लीक झालेले प्रश्न प्रत्यक्ष नीटच्या प्रश्नपत्रिकेत आल्याचे निष्पन्न झाले आहे. सीबीआयकडून अटकसत्र सुरूच दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 3 मे रोजी नीट-यूजी परीक्षेचे आयोजन केले होते. मात्र पेपर फुटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ती रद्द करून आता ही परीक्षा 21 जून रोजी नव्याने घेतली जाणार आहे. या संपूर्ण पेपरफुटी प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत असून, त्यांनी धडक कारवाई करत आपले अटकसत्र सुरू ठेवले आहे. मनीषा हवालदार हिच्या अटकेच्या रूपाने सीबीआयने पुण्यातून केलेली ही अकरावी मोठी कारवाई असून, यामुळे या रॅकेटचे आणखी काही धागेदोरे उघड होण्याची शक्यता आहे. नीट पेपरची महाराष्ट्रात सर्वाधिक विक्री दरम्यान, सीबीआय चौकशीत उघड झाले आहे की, नीटचा पेपर 5 राज्यांमध्ये विकला गेला होता. सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात झाली आणि दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान आहे. एजन्सीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून आणि डिजिटल गॅजेट्स तपासल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. सीबीआयचे म्हणणे आहे की, पुढील आरोपींच्या अटकेनंतर पेपरफुटीचे प्रकरण आणखी मोठे असू शकते. याच कारणामुळे एजन्सीला अजून हे निश्चित करता येत नाहीये की, किती विद्यार्थ्यांनी पेपर विकत घेतला होता. चौकशीत समोर आले आहे की, काही पालकांनी पेपर पुढे इतर लोकांना विकला होता, असे सीबीआयचे म्हणणे आहे.
Source link
NEET पेपरफुटी प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई:पुण्यातून आणखी एका 'मनीषा'ला अटक; भौतिकशास्त्राचे प्रश्न लीक केल्याचा आरोप