![]()
सोशल मीडियावरील ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या व्यंगात्मक पेजवरून देशातील बेरोजगारी आणि व्यवस्थेवर टीका करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या तरुणाला अमेरिकेत जाऊन जिवे मारू, अशी धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे अभिजित दिपकेच्या वाळूज येथील घराभोवती पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे. अभिजित अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात शिक्षण घेत आहे. ‘पैसे घे आणि पेज बंद कर,अन्यथा अमेरिकेत शोधून मारू,’ अशा शब्दांत त्याला धमकावण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय पातळीवरून आलेल्या धमकीनंतर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून वाळूज येथील त्याच्या घराबाहेर १५ पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. अभिजीतने शुक्रवारी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर एक व्हिडिओ आणि काही स्क्रीनशॉट शेअर करत या धक्कादायक प्रकाराला वाचा फोडली. धमकी देणाऱ्याने त्याला “हवे तितके पैसे घे, पेज तात्काळ बंद कर किंवा थेट भाजपमध्ये प्रवेश कर. आमचे ऐकले नाही, तर तू सध्या राहत असलेल्या अमेरिकेतही तुला शोधून मारून टाकले जाईल,” असा मेसेज पाठवला आहे. या घटनेनंतर जगभरातील नेटकऱ्यांनी अभिजीतच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. दिपके कुटुंबाचे फोन बंद; सुरक्षित स्थळी हलवले? या घटनेनंतर अभिजितचे वडील भगवान दिपके यांचे दोन्ही मोबाइल फोन बंद येत आहेत. दिपके कुटुंबीय विदर्भात एका कौटुंबिक कार्यक्रमाला गेल्याचे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना अज्ञात आणि सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. वाळूजमध्ये घराला पोलिसांचा वेढा, सीसीटीव्हीची नजर दिपकेला मिळालेल्या धमकीचे गांभीर्य ओळखून स्थानिक प्रशासनाने वाळूज येथील दिपके यांच्या घरासमोरील छोटी भाजी मंडई हटवली असून परिसराची स्वच्छता केली आहे. तसेच, नातेवाइकांच्या मदतीने घराच्या परिसरात नव्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्याशिवाय पोलिसांचा मोठा फौजफाटा दिपकेंच्या घराभोवती २४ तासांसाठी तैनात करण्यात आला आहे. प्रारंभी केवळ चार पोलिस तैनात करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर पोलिस आयुक्तांनी बंदोबस्तासाठी आणखी ११ पोलिस कर्मचारी तैनात करण्याचे संबंधित पोलिस ठाण्याला आदेश दिल्यानंतर तातडीने ११ पोलिस कर्मचारी सुरक्षा बंदोबस्तावर हजर झाले. खबरदारी म्हणून सुरक्षा “खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही वाळूज येथील घराबाहेर १५पोलिस अंमलदार आणि एक वाहन रात्रंदिवस तैनात केले आहे. अशी सुरक्षा देणे ही पोलिसांची नेहमीचीच प्रशासकीय प्रक्रिया असून, त्यामध्ये वेगळे असे काहीही नाही.” – पंकज अतुलकर, उपायुक्त, परिमंडळ – १
Source link
दिपकेला धमकी- ‘कॉक्रोच जनतापार्टी’ बंद कर, नाही तर शोधून मारू:अभिजित दिपकेच्या संभाजीनगरातील घराभाेवती पोलिसांचा बंदोबस्त