![]()
लासूर स्टेशन, सावंगी, देवळीसह परिसरात शनिवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. रोहिणी नक्षत्र लागण्यापूर्वीच आलेला पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या कांदा, तसेच फळबागांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे शेतशिवारातील अनेक झाडे उन्मळून पडल्याने विजेच्या तारा तुटल्या. परिणामी, संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा खंडित होता. रात्री उशिरापर्यंत महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करत होते, अशी माहिती अभियंता भुते यांनी दिली. देवळी, सुलतानाबाद, महंमदपूर, आरापूर आणि गवळी शिवारातही पावसाचा तडाखा बसला. ढोरकीन | पैठण तालुक्यातील रांजणगाव खुरी येथे उरुसानिमित्त सुरू असलेल्या यात्रेला शनिवारी वादळी वाऱ्याचा फटका बसला. अचानक आलेल्या वादळामुळे यात्रा परिसरातील अनेक स्टॉल, तंबू, खेळणी दुकाने तसेच रहाट पाळणे कोसळल्याने मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही ठिकाणी लोखंडी पत्र्यांचे तंबू कोसळले आहेत. जुने देवळी परिसरातील सुलतानाबाद शिवारात वीज पडून शेतकरी परसराम कचरू पाटील तायडे यांचा खिल्लार जातीचा बैल ठार झाला. दुसरीकडे, महंमदपूर शिवारातील शेतकरी नंदू भागीनाथ पाटील जाधव यांचे एक एकर क्षेत्रावरील शेडनेट वादळाने भुईसपाट झाले. शेडनेटमधील कोथिंबीर पिकासह १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे शेतकरी अर्जुन कारभारी क्षीरसागर यांच्या गट क्र. १०८५ मधील एक एकर क्षेत्रावरील शेडनेट उडून गेले. शेतकरी निलेश सुराशे यांच्या गोठ्यावरील पत्रे उडून गेली आहेत. पाचोड जवळील मुरमा, कोळी बोडखा, सानपवाडी परिसरात ५ वाजेच्या सुमारास गारांसह जोरदार पाऊस झाला. यामुळे काढणीस आलेली उन्हाळी बाजरीची पिके जमिनीवर आडवी झाली.
Source link
पिकांचे नुकसान:लासूर, पाचोड, शिऊरला अवकाळीचा तडाखा, देवळीमध्ये वीज पडून बैल ठार, शिऊर येथे शेडनेट कोसळले, वीजपुरवठा खंडित