![]()
विदर्भातील अकोला जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून, या भीषण उष्णतेच्या तीव्रतेचा मोठा फटका आता मुक्या वन्यजीवांना बसू लागला आहे. जंगलातील व नैसर्गिक पाणवठे सुकल्यामुळे पाण्याच्या शोधात हे वन्यजीव मानवी वस्तीकडे व शेत शिवारात धाव घेत आहेत. मात्र, यामुळे ते गावातील पाळीव व भटक्या कुत्र्यांच्या निशाण्यावर येत असल्याच्या घटना घडत आहेत. नुकतीच अशीच एक हृदयद्रावक घटना अकोला परिसरातील एका शेतात घडली. पाण्यासाठी भटकणारे एक काळवीट पाण्याचा शोध घेत असताना अचानक भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडले. कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केल्यामुळे ते जीव वाचवण्याच्या प्रयत्नात एका खोल खड्ड्यात कोसळले. दुखापतीमुळे त्याला बाहेर पडता येत नसल्याने ते तेथेच तडफडत होते. सुदैवाने, शेतात काम करणारे ग्रामस्थ सुनील सावीकर व यश सावीकर यांच्या हे लक्षात आले. त्यांनी तत्काळ अकोला येथील वन विभागाशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून आरएफओ कटारिया, वनपाल गजानन गायकवाड आणि वनरक्षक तापडे यांनी तातडीने पावले उचलली. त्यांनी मानद वन्यजीव अभ्यासक बाळ काळणे व पशू वैद्यकीय सहाय्यक प्रवीण पवार यांना घटनास्थळी रवाना केले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने काळविटाला सुखरूप बाहेर काढून रस्त्यावर आणले आणि तिथेच त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. पाण्याच्या शोधात सोडतात अधिवास वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, कडक उन्हाळ्यामुळे वन्यजीवांना तीव्र तहान लागते. पाण्याच्या शोधात ते नेहमीचा सुरक्षित अधिवास सोडून मानवी वस्तीकडे येतात आणि कुत्र्यांचे भक्ष्य बनतात. अकोला वन विभाग अशा कठीण प्रसंगात वन्य जीवांचे प्राण वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे.
Source link
कुत्र्यांच्या हल्ल्यात काळवीट, नीलगाय गंभीर जखमी:शेतकऱ्यांनी दिली वन विभागाला माहिती, वनपाल, वन्यजीव अभ्यासकांकडून रेस्क्यू