![]()
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वाशिम जिल्ह्यात जबर झटका बसला आहे. ठाकरे गटाचे येथील माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी आपले शिवबंधन सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे 250 हून अधिक कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. सुरेश मापारी यांनी दोन दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते भाजपमध्ये जाण्याची चर्चा सुरू होती. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावून त्यांचे मतही जाणून घेतले होते. त्यानंतर त्यांनी अपेक्षेनुसार भाजपत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, ते शनिवारी रात्रीच आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह मुंबईच्या दिशेने निघालेत. ते आज तिथे पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचे कमळ हाती घेतली. त्यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला वाशिममध्ये मोठा झटका बसला आहे. खासदार संजय देशमुख यांच्याशी होते मतभेद सुरेश मापारी यांचे ठाकरे गटाचे स्थानिक खासदार संजय देशमुख यांच्याशी तीव्र मतभेद होते. त्यांनी अनेकदा संजय देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. पक्षश्रेष्ठींच्या कानावरही त्यांनी ही गोष्ट घातली होती. पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. अखेर त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत आपली वेगळी वाट निवडण्याचा निर्णय घेतला. ठाकरे गटाने कुणकुण लागताच केली होती कारवाई उल्लेखनीय बाब म्हणजे सुरेश मापारी भाजपमध्ये जाणार असल्याची कुणकुण ठाकरे गटाला यापूर्वीच लागली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून दोन दिवसांपूर्वीच ठाकरे गटाने सुरेश मापारी यांच्याकडील जिल्हाप्रमुख पदाची सूत्रे काढून घेतली होती. त्यानंतर ती सूत्रे बालाजी वानखेडे यांच्याकडे सोपवली होती. त्यावर मापारी यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर लगेचच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. कोण आहेत सुरेश मापारी? सुरेश मापारी हे वाशिम जिल्ह्यातील एक बडे नेते मानले जातात. त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य, अर्थ आणि बांधकाम समितीचे सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यासारखी अनेक महत्वाची पदे सांभाळली आहेत. वाशिमच्या ग्रामीण भागात कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे मोठे जाळे त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये याचा मोठा धक्का ठाकरे गटाला बसेल असा दावा केला जात आहे. हे ही वाचा… एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर:केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेणार भेट; राज्याच्या राजकारणात काय घडणार? सर्वांना उत्सुकता सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेत. ते तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीचे नेमके कारण समजू शकले नाही, पण ही भेट विधान परिषदेच्या निवडणुकीतील जागावाटप व जागांची अदलाबदली या भोवती फिरती राहणार असल्याचा अंदाज आहे. विशेषतः ऑपरेशन टायगरवर या भेटीत चर्चा होईल काय? असाही प्रश्न या निमित्ताने चर्चिला जात आहे. वाचा सविस्तर
Source link
उद्धव ठाकरेंची बड्या निष्ठावंताने सोडली साथ:250 कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हजेरीत भाजपमध्ये करणार प्रवेश