Headlines

अमरावती रुग्णालयासमोर कचऱ्याचे ढिगारे:एसटी बसस्थानक परिसरात अस्वच्छतेमुळे आरोग्याला धोका




अमरावती शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचे महापालिका प्रशासनाचे दावे जमिनीवरील परिस्थितीशी पूर्णपणे विसंगत आहेत. शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या एसटी बसस्थानकाच्या भिंतीला लागून असलेल्या एका खाजगी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरच कचऱ्याचे ढिगारे साचल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. ज्या संवेदनशील ठिकाणी सर्वाधिक स्वच्छतेची गरज आहे, त्याच ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने महापालिकेच्या स्वच्छता अभियानाचा बुरखा फाटला आहे. एसटी बसस्थानक परिसर हा शहराचा मुख्य केंद्रबिंदू असल्याने येथे दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असते. त्यातच बसस्थानकाच्या भिंतीला लागून रुग्णालय असल्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही बरीच आहे. मात्र, रुग्णालयाबाहेर ओला-सुका कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या आणि टाकाऊ वस्तू उघड्यावर टाकल्या जात असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. हा कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने तो सडून डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णालयात आधीच विविध आजारांनी ग्रस्त असलेले रुग्ण उपचारासाठी दाखल असतात, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. अशा स्थितीत दवाखान्याबाहेर पसरलेली ही घाण त्यांच्यासाठी अधिक घातक ठरत आहे. “आम्ही येथे आजार बरे करायला येतो की नवीन आजार अंगावर ओढवून घ्यायला?” असा संतप्त सवाल रुग्णांच्या नातेवाईकांकडून विचारला जात आहे. बसस्थानकावरून उतरून रुग्णालयात ये-जा करताना रुग्ण आणि प्रवाशांना नाक दाबून प्रवास करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आगामी काळात जर हीच परिस्थिती राहिली, तर बसस्थानक आणि रुग्णालय परिसरात डेंग्यू, मलेरिया आणि गॅस्ट्रोसारख्या साथीच्या आजारांचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने या समस्येची दखल घेऊन बसस्थानक व रुग्णालयाच्या भिंतीजवळ साचणारा हा कचरा कायमचा हटवावा. तसेच या परिसरात नियमित जंतुनाशक फवारणी करून अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी अमरावतीकरांकडून केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *