Headlines

प्रगतिशील शेतकरी:तोंडल्याने पालटले नशीब; अवघ्या 13 गुंठ्यात वार्षिक 5 लाख उत्पन्न; टेंभुर्णीच्या शेतकऱ्याचा पारंपरिक शेतीला फाटा देत प्रयोग




सतत बदलणारे हवामान, खतांचे वाढते गगनचुंबी दर आणि बाजारपेठेतील अनिश्चितता यामुळे पारंपरिक शेती बेभरवशाची ठरत असताना, माढा तालुक्यातील टेंभुर्णीजवळील चव्हाणवाडी येथील एका प्रगतीशील युवकाने आपल्या कल्पकतेच्या जोरावर शेतीचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. येथील तरुण शेतकरी शाम नांगरे यांनी अवघ्या १३ गुंठ्यांच्या छोट्याशा जमिनीच्या तुकड्यात ‘अलिबाग’ जातीच्या तोंडलीची यशस्वी लागवड करून, त्यातून वर्षाकाठी तब्बल ५ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवण्याची किमया साधली आहे. विशेष म्हणजे, या शिवारातील तोंडली व्यापाऱ्यांमार्फत थेट लंडन, कुवेत आणि इराणसारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झेप घेत आहेत. शाम नांगरे हे उच्चशिक्षित तरुण शेतकरी असून, पारंपरिक पिकांमधून होणारे सातत्यपूर्ण नुकसान टाळण्यासाठी त्यांनी नगदी फळभाजी पिकाकडे वळण्याचा निर्णय घेतला. कमीत कमी खर्चात आणि मर्यादित क्षेत्रात सर्वाधिक उत्पादन देणारे पीक म्हणून त्यांनी तीन वर्षांपूर्वी तोंडली या पिकाची निवड केली. शेती यशस्वी करण्यासाठी शाम यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अत्यंत कल्पक वापर केला आहे. त्यांनी संपूर्ण क्षेत्रात आधुनिक स्टेजिंग (मंडप) पद्धत अवलंबून वेलींची योग्य पद्धतीने मांडणी केली. लागवडीनंतर अवघ्या दीड ते दोन महिन्यांत उत्पादन सुरू झाले. दरम्यान, टेंभुर्णीतील अनिल भागवत जगताप यांनीही घराशेजारील शेतात १४ गुंठ्यात तोंडले लावले आहेत. यात त्यांच्या मुली अंकिता, आकांक्षा मुलगा ओंकार हे तोंडली तोडून पैसे कमावतात आणि शेतीची हौसही पूर्ण होत असल्याचे अंकिता म्हणाली. परिसरातून रोज १० टन तोंडले मार्केटला टेंभुर्णी परिसरातील चव्हाणवाडी, गार अकोले, बेंबळे, शेलगाव या गावांतून रोज ८ ते १० टन तोंडले गोळा केले जातात. ही तोंडली नवी मुंबईच्या वाशी मार्केटमधील व्यापाऱ्यांमार्फत थेट लंडन, कुवेत आणि इराणमध्ये एक्स्पोर्ट केली जात आहेत. या दर्जेदार मालाला प्रति किलो २० रुपयांपासून ते १२० रुपयांपर्यंतचा सर्वोच्च दर मिळत आहे. शाम नांगरे यांच्या या यशापासून प्रेरणा घेऊन परिसरातील तब्बल ४० हून अधिक तरुण शेतकऱ्यांनी आता तोंडलीच्या आधुनिक शेतीकडे आपला मोर्चा वळवला आहे. तोंडले शेतीचे खर्च-उत्पन्नाचे गणित असे शाम नांगरे हे उजनी धरणाच्या लगत असलेल्या टेंभुर्णी परिसरातील चव्हाणवाडीत १३ गुंठ्यात तोंडल्याचे पिक घेत आहेत. याआधी त्यांनी केळी व इतर फळपिके घेतली. पण निसर्गाच्या लहरीपणामुळे यातून त्यांना तोटाच अधिक झाल्याने ते तोंडल्याकडे वळले. आधुनिक स्टेजिंग (मंडप) पद्धत, ठिबक सिंचन आदीसाठी त्यांना एकरी २ लाखांच्या आसपास खर्च येतो. मालाच्या गुणवत्तेनुसार, सध्या प्रति किलो २० रुपये ते १२० रुपयांपर्यंत भाव मिळतो. यातून त्यांना ५ लाखांचा निव्वळ नफा होत आहे. शिवाय तोडणी व पॅकिंगमुळे ग्रामीण महिलांना गावातच कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध झाला आहे. शेतकरी मोबाइल नंबर : 9172428797 (शाम नांगरे)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *