![]()
प्रतिनिधी | अमरावती सलग दोन आठवड्यांपासून अमरावतीत उष्णतेचा कडाका कायम आहे. हवामान विभागाने ही परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. पुढील पाच दिवस अमरावतीकरांना या जीवघेण्या उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. २९ मेपासून तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मागील चार दिवसांपासून शहरासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. या काळात प्रचंड उकाडा जाणवत आहे. मागील दोन दिवसांपासून तापमान ४६ अंशांच्या खाली आले आहे. तरीही उन्हाची तीव्रता कमी झालेली नाही. दिवसभर उन्हाचे चटके जाणवत आहेत. रात्री उष्ण वारे वाहत आहेत. असे वातावरण कायम आहे. रविवारी अमरावतीत ४५.२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, २५ व २६ मे रोजी अमरावती शहर व जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. २६ मेपासून तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता आहे. तरीही उष्णतेची तीव्रता कायम राहणार आहे. २९ मेपासून तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज आहे. सायंकाळच्या वेळी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. एकंदरीत, अमरावतीकरांना येणारा संपूर्ण आठवडा मागील दोन आठवड्यांप्रमाणेच उष्णतेच्या झळा सहन करत काढावा लागणार आहे. अमरावती शहर व जिल्ह्यासाठी आणखी दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतरच्या तीन दिवसांत तापमानात काहीशी घट होऊ शकते. मात्र उष्णतेची तीव्रता कायम राहील. २९ मेपासून तापमानात घट होणार आहे. काही ठिकाणी सायंकाळच्या वेळी जोरदार वारा वाहू शकतो. हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात.
Source link
पुढील ५ दिवस उकाड्यापासून सुटका नाही:दोन दिवस रेड अलर्ट; त्यानंतरही तीन दिवस चटके कायम, पूर्वमोसमी पावसाकडे लक्ष