![]()
नटरंग ॲकॅडमीतर्फे दिल्या जाणाऱ्या ३२व्या स्व. शाहीर मधू कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कलागौरव पुरस्काराने लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगना अमृता खानविलकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच, चौथ्या स्वर्गीय गिरीश बापट स्मृती नटरंग प्रतिष्ठान सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने गणेशभक्त व सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते यांचा गौरव केला जाईल. पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार, २९ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. ही माहिती नटरंग ॲकॅडमीच्या अध्यक्षा, नगरसेविका स्वरदा बापट आणि कार्याध्यक्ष जतिन पांडे यांनी दिली. स्व. शाहीर मधू कडू हे प्रसिद्ध लोककलावंत होते. रंगभूमीवरील त्यांच्या कार्याला आदराने सलाम करण्यासाठी त्यांच्या नावाने दरवर्षी एका प्रसिद्ध कलावंताला हा पुरस्कार दिला जातो. शाल, श्रीफळ, तुळशीचे रोप, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, मानाचा फेटा आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राजकीय क्षेत्रातील योगदानासोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात स्वर्गीय गिरीश बापट यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तीच्या कार्याची दखल घेण्यासाठी बापट यांच्या नावाने सामाजिक कार्यकर्त्यास हा पुरस्कार देऊन गौरविले जाते. या कार्यक्रमास महापौर मंजुषा नागपुरे, अभिनेत्री प्राजक्ता माळी, दीपक मानकर, राघवेंद्र मानकर, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित, ललित जैन, अजय खेडेकर, बाळासाहेब दाभेकर, विजय कडू, राजेश येनपुरे, गायत्री खडके, मेघराज राजेभोसले, जयमाला इनामदार, धनोत्तम लोणकर, दत्ता सागरे, विठ्ठल गिरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्ताने नटरंग कला ॲकॅडमीच्या १२५ गुणवान कलाकारांचा नृत्य, संगीत आणि विनोदावर आधारित ‘नृत्यरंग’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अमृता खानविलकर या एक उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून ओळखल्या जातात. लहानपणापासूनच त्यांना नृत्य आणि अभिनयाची आवड होती. ‘नटरंग’ चित्रपटातील त्यांच्या नृत्याविष्कारासह ‘कट्यार काळजात घुसली’, ‘राझी’, ‘मलंग’, ”चंद्रमुखी’ आदी चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. शिरीष मोहिते यांचा अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग आहे. पुणे शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळे एकत्रित करून ‘जय गणेश व्यासपीठा’च्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. या व्यासपीठाच्या माध्यमातून पुणे शहरात वेगवेगळ्या भागांत मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबविले जातात. ‘सेवा मित्र मंडळा’च्या माध्यमातून ते विविध विषयांवर समाज प्रबोधनाचे कामही करत आहेत.
Source link
अमृता खानविलकरला नटरंग कलागौरव पुरस्कार:गिरीश बापट स्मृती कृतज्ञता पुरस्कार शिरीष मोहिते यांना जाहीर