Headlines

राजगडमध्ये हॉटेल मालकावर कोयत्याने हल्ला:हवेत गोळीबार, जुना वाद, दोघे जखमी; दोन संशयित ताब्यात




राजगड (वेल्हा) तालुक्यातील कोदवडी फाट्यावरील हॉटेल ‘श्रीनाथ’ येथे जुन्या वादातून हॉटेल मालक आणि कामगारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यादरम्यान आरोपींनी हवेत गोळीबार करत हॉटेलची तोडफोड केली. या घटनेत दोघे जखमी झाले असून, पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. वेल्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ४ ते ५ अज्ञात हल्लेखोरांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यांनी हॉटेलचे मालक म्हस्कू तानाजी दासवडकर आणि वेटर दशरथ शिळीमकर यांच्यावर धारदार कोयत्याने वार केले. दोन्ही जखमींवर नसरापूर येथील सूर्यवंशी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. हल्ला करताना आरोपींनी अग्निशस्त्राचा वापर करून हवेत गोळीबार केला. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी स्पष्ट केले की, गोळीबार व्यक्तींवर नसून हवेत करण्यात आला होता आणि जखमींना पिस्तुलाच्या गोळ्या लागल्या नसून धारदार शस्त्राने (कोयत्याने) झालेल्या जखमा आहेत. हल्लेखोरांनी हॉटेलमधील साहित्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण केली. घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान गणेश धारपळे आणि ओंकार जाधव या संशयित आरोपींची नावे समोर आली. पोलिसांनी ओंकार सुरेश इंगुळकर (१९) आणि विशाल आप्पा इंगुळकर (२४, दोघे रा. सुरवड, ता. वेल्हे, जि. पुणे) यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे वेल्हा परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस इतर फरार आरोपींचा कसून शोध घेत असून, वेल्हे पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *